डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटाने डोंबिवली शहर हादरले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४० कर्मचारी जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या हादऱ्याने लगतच्या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर आजूबाजूच्या कंपनीतील कर्मचारी घाबरून बाहेर आले. हा परिसर रिकामा करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. डोंबिवलीतील सोनारपाडाजवळील ‘हार्डीमर’ बनविणारी अमुदान केमिकल कंपनीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फ़ोटाची तीव्रता इतकी मोठा होती की आजूबाजूच्या परिसरातील इमारती, दुकाने यांच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे नागरिक घाबरून घराबाहेर धावले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे सहा ते सात बंब व पालिकेचे सात ते आठ पाणी टँकर आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र पाच ते सहा तास आगीच्या ज्वाऴा व धुराचे लोट दूरवर दिसत होत्या. या स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ४० जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमुदान केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचा फुटल्या तसेच काही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी
घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार प्रमोद (राजू ) पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती आम्ही घेत आहोत. या स्फोटातील मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी व जखमींना सरकार आर्थिक मदत करेल. वास्तविक पाहता शहराजवळ केमिकल कंपनी असू नये. आता या केमिकल कंपन्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत यावर अंमलबजावणी करता आली नाही. ४ जूननंतर यावर पावले उचलली जातील याची खात्री देतो.
या घटनेवर विरोधी पक्षाने उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ही घटना गंभीर असून त्याचे विरोधी पक्षाने राजकारण करू नये. अशी घटना पुन्हा होणार नाही याकडे सरकार लक्ष देईल. कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. देवेन सोनी म्हणाले की, केमिकल कंपनीला आग लागल्याने त्याचा आजबाजूच्या कंपन्यांनाही फटका बसला आहे.आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त कंपनीतील बॉयलर बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. या स्फोटानंतर कंपनीतील लोखंडी तुकडे दोन किलोमीटर दूर गांधीनगर येथील सुभाष डेअरीजवळ आणि जयमुक्ता इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पडले. यात येथील रहिवासी गीतांजली आंब्रे या सुदैवाने वाचल्या. मनविसे डोंबिवली शहरअध्यक्ष मिलिंद म्हात्रे म्हणाले, दुपारच्या सुमारास मी गाडीने सुभाष डेअरीजवळ जात असताना समोरून मोठा लोखंडी तुकडा येऊन पडला. यावेळी माझी गाडी जरा पुढे असती तर तो लोखंडी तुकडा माझ्या गाडीवर पडून मी जखमी झालो असतो. दैव बलत्तर म्हणून मी वाचलो.
डोंबिवलीतील धोकादायक कंपन्या तत्काळ बंद करणार - मुख्यमंत्री
मानवी जीविताला हानिकारक ठरणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील धोकादायक कंपन्या तत्काळ बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अतिधोकादायक कंपन्यांनी आपल्या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत अभियांत्रिकी, कापड किंवा अन्य बदल करून ते आहे त्या जागेत चालू ठेवावेत. असे बदल ज्यांना करायचे नसतील त्यांनी शहराबाहेर शासनाने भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित व्हावे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीला गुरुवारी रात्री भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
या दुर्घटनेतील मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जे जखमी आहेत त्यांना देखील शासनाकडून मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार
या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करू. जे दोषी आढळून येतील त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. संबंधित विभागाला कारवाईची सूचना दिली आहे. या घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल व यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यापूर्वी घडलेल्या घटना
>१० नोव्हेंबर २०१३: खंबाळपाडा रस्त्यालगतच्या सन बीम मेनोकेम या रासायनिक कंपनीत आग. लाखो रुपयांचा कच्चा माल खाक.
>१८ डिसेंबर २०१४ : औरेक्स कंपनीत रात्री साडेबाराच्या सुमारास आग. औषधे बनवण्यासाठी लागणाऱ्या टोलविन या रसायनाच्या साठ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.
>३० जानेवारी २०१५ : एमआयडीसी फेज-२ मध्ये शनी मंदिराच्या मागे असलेल्या नार्केम कंपनीत मध्यरात्री १ च्या सुमारास आग. ती विझवण्यासाठी कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, नवी मुंबईतून अग्निशमन दलाचे बंब मागवावे लागले होते.
>२८ नोव्हेंबर २०११ : एमआयडीसी फेज-२ मधील अमाईन केमिकल कंपनीत आग. कंपनीचे मोठे नुकसान.
>२५ नोव्हेंबर २०१२ : शारदा सिंथेटिक्स या कंपनीला आग. कपड्यांचा लाखो रुपयांचा कच्चा माल खाक.
>१२ मे २०१३ : एमआयडीसी फेज-२ मधील हेयर डाय कंपनीला आग. एकाचा मृत्यू.
>१३ मे २०१३ : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे केम स्टार कंपनीत भीषण आग. एका कामगाराचा मृत्यू.