

डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बुधवारी विष्णू नगर पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांहून अधिक काळ उलटून गेल्यावर ही मोठी कारवाई झाली.
या प्रकरणी, म्हात्रे यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. यापूर्वी रमेश पवार, अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम या म्हात्रे यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक गर्भवती महिला मंगळवारी प्रसूतीसाठी आली असता तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज असल्याचे शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले. या रुग्णालयात जागा नसल्याने तिला अन्यत्र हलवावे अशी सूचनाही डॉक्टरांनी केली. यावरून वाद होऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती.
मंगळवारच्या घटनेने सर्व वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी ओपीडी आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवून आंदोलन सुरू ठेवले. केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या होत्या. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांनीही आपली ओपीडी सेवा बंद ठेवली होती.
एफआयआरमध्ये नाव असूनही, रमेश म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याऐवजी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, आपण महिला डॉक्टरांना मारहाण केली नसून केवळ त्यांच्या हाताला 'टॅप' केले होते, असा दावा केला. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेला सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा अँगलमुळे दिशाभूल करणारा असल्याचेही त्यांनी म्हटले.
मुख्य आरोपीच्या अटकेचे डॉक्टरांनी स्वागत केले असले तरी, जोपर्यंत तपासाचा प्रगती अहवाल समाधानकारक वाटत नाही आणि सर्व आरोपींवर निष्पक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे वैद्यकीय संघटनांनी स्पष्ट केले आहे. मारहाणीची गंभीर घटना घडल्यानंतरही एफआयआर नोंदवण्यासाठी १२ तासांचा उशीर का झाला व आरोपी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद कशी घेतली असा प्रश्नही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
शिस्तभंगाची कारवाई
शास्त्रीनगर मारहाण प्रकरणाची कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे.
आज डोंबिवलीतील रुग्णालयांचा ‘बंद’
शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरणी गुरुवारी डोंबिवलीतील दवाखाने व रुग्णालयातील ओपीडी (बाह्य रुग्ण तपासणी ) ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती डॉ. मंगेश पाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ठाणे जिल्हातील सर्व डॉक्टरांनी निषेध सभा घेतली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.