डोंबिवलीत भारत गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा; १५ दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस नाही; महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल

डोंबिवली शहरासह विशेषतः आजदे, सागर्ली आणि परिसरातील ग्रामीण भागात भारत पेट्रोलियम (भारत गॅस) सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. तब्बल १५ दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
डोंबिवलीत भारत गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा; १५ दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस नाही; महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल
डोंबिवलीत भारत गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा; १५ दिवसांपूर्वी बुकिंग करूनही गॅस नाही; महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हालप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

शंकर जाधव/डोंबिवली

डोंबिवली शहरासह विशेषतः आजदे, सागर्ली आणि परिसरातील ग्रामीण भागात भारत पेट्रोलियम (भारत गॅस) सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. तब्बल १५ दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नव्हे, तर काही ग्राहकांचे बुकिंग कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबाईल संदेश न देता रद्द करण्यात येत असल्याची तक्रारही समोर आली आहे.

सध्या घरपोच गॅस वितरण सेवा अनेक भागांत बंद असल्याने ग्राहकांना स्वतः गॅस सिलिंडर आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे घरपोच सेवा विस्कळीत झाल्याचे सांगितले जात असले, तरी एजन्सीची नियोजन व्यवस्था आणि पुरवठा यंत्रणा योग्य नसल्यामुळेच हा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याची भावना ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे. आशिष नेवाळकर हा युवक शिक्षणासोबत नोकरी करत असून, गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी त्याला कामावर दांडी मारून गोदामात यावे लागल्याचे त्याने सांगितले. या समस्येबाबत अनेक नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान, गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचीही चर्चा परिसरात सुरू असून, संबंधित शासकीय यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आधीच महागाई आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यात वेळेवर गॅस न मिळणे, तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे आणि अतिरिक्त वाहतूक खर्च सहन करावा लागणे, यामुळे विशेषतः महिलांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन तो मार्गी लावावा. तसेच आजदे, सागर्लीसारख्या ग्रामीण भागात महानगर गॅस (पाइप गॅस) पुरवठा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक भुर्दंड

आजदे, सागर्ली आणि परिसरातील ग्राहक एमआयडीसीतील उस्मा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या चैतन्य गॅस एजन्सीच्या गोदामावर सिलिंडर मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे, सिलिंडरची पावती काढण्यासाठी ग्राहकांना प्रथम नेहरू मैदानाजवळील चैतन्य गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागते. त्यानंतर पुन्हा गोदामात जाऊन सिलिंडर घ्यावा लागत असल्याने रिक्षाभाड्यासह वाहतुकीवर किमान १०० रुपयांचा अतिरिक्त खर्च ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा आर्थिक भुर्दंड ठरत आहे.

घरातील गॅस संपल्यानंतर नियमानुसार बुकिंग केले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही सिलिंडर न मिळाल्याने त्या सकाळी थेट गोदामात गेले. सिलिंडरबाबत एजन्सीकडे जाब विचारला असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

योगीता थोटांगे, रहिवासी आजदे

logo
marathi.freepressjournal.in