

डोंबिवली : इराण-इस्रायल युद्धाचे पडसाद आता देशातही उमटू लागले असून गॅस तुटवड्याची झळ उद्योगांना बसू लागली आहे. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक उद्योगपती आणि कामगारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. उद्योजकांनी पर्यायी इंधनाचा विचार करावा, असे निर्देश देण्यात आल्याने उद्योग क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी दिली.
डॉ. सोनी पुढे म्हणाले की, प्रदूषणाचा विचार करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना एलडीओ (कमी घनतेचे तेल) ऐवजी पीएनजी (Piped Natural Gas) म्हणजे पाईपलाइनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सुमारे ७० टक्के कारखाने सध्या पीएनजीचा वापर करत आहेत. त्यामुळे कारखान्यांतून होणारे प्रदूषण व काळा धूर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
मात्र आता आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम पीएनजी पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पीएनजी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध साठा मर्यादित असल्याने उद्योगांनी पर्यायी इंधनाचा विचार करावा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारखान्यांतील कामगार वर्गही यामुळे अस्वस्थ आहे. कारखान्यांना लागणारे कच्चा माल वेळेवर मिळत नसून त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. याचा थेट परिणाम उद्योगांवर होत असून काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
“युद्ध लवकर थांबावे आणि उद्योग सुरळीत सुरू राहावेत,” अशी प्रार्थना कामगार व उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.