डोंबिवली : प्रत्येकाचे घर होणे हे स्वप्न असते, मात्र प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून सर्व एका छताखाली मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न बघतायेत, त्यातील एक ट्रिलियन डॉलर हे महाराष्ट्राचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये सांगितले.
चाकरमान्यांना मुंबई व ठाणे येथे परवडणारी घरे मिळत नसल्याने त्यांची पाऊले कल्याण-डोंबिवली शहराकडे वळली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एससीएचआय कल्याण-डोंबिवली युनिटच्या वतीने कल्याणात दरवर्षी प्रॉपर्टी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावर्षी ८ ते ११ फेब्रुवारीपर्यंत १३ वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी वाढदिवस झाला असतांना या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, एक्झीबिशन कमिटी सचिव सुनील चव्हाण, प्रमुख सल्लागार तथा माजी अध्यक्ष रवि पाटील, संजय पाटील, साकेत तिवारी, जयेश तिवारी, दिनेश मेहता, राहुल कदम, विकास वीरकर, रोहित दीक्षित, राजेश गुप्ता आदी उपस्थित होते.
क्लस्टर याेजना राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
महाराष्ट्र हे पहिले असे राज्य आहे, जिथे क्लस्टर योजना सुरू झाली. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना सुरू झाली असून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत देखील क्लस्टरची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बांधकाम व्यावसायिकांना सांगितले. यावेळी नऊ मीटरच्या रस्त्यासाठी आठ माळ्यांची मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव बांधकाम व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. या प्रस्तावाला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.