Dombivli Fire Update: डोंबिवलीतील दोन कंपन्यांमध्ये भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली, नागरिकांमध्ये भीती
- शंकर जाधव
डोंबिवलीजवळील इंडो अमाइन्स आणि मालदे केमिकल कंपनीला बुधवारी १२ तारखेला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग लागताच कंपनीतील कामगार बाहेर आल्याने जीवितहानी टळली. मात्र या दोन्ही कंपनी आगीत जळून खाक झाल्या. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यामुळे आजूबाजूकडील इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारी म्हणून त्याच परिसरातील अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले होते. तर या आगीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन शालेय मिनीबस खाक झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील इंडो अमाइन्स ही एन्ग्रोइंटरमिडी (खत बनविण्यासाठी रॉ मटेरियल) बनविणारी कंपनी आणि कॅपेसिटर बनविणारी मालदे केमिकल कंपनी या दोन्ही कंपन्यांना सकाळच्या सुमारास आग लागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे १५ बंब दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर निंयत्रण मिळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगार बाहेर धावत गेल्याने जीवितहानी टळली. याप्रकरणी डोंबिवलीजवळील एमआयडीसी परिसरात बुधवारी इंडो अमाइन्स आणि मालदे कंपनीला आग लागली. या घटनांवर गंभीर्याने लक्ष देत केमिकल कंपनी स्थलांतरबाबत शासनाकडून कृती आराखडा समिती नेमण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी कल्याण मुख्यालयात आयुक्त दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात पसरलेल्या केमिकलच्या वासाने नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबराबेर ही आतापर्यंतची दुसरी घटना त्यामुळे आम्ही वास्तव्य करावे कुठे? असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे.
कंपन्या स्थलांतराबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा- जितेंद्र आव्हाड
डोंबिवलीच्या ‘एमआयडीसी’तील केमिकल कंपनीला आज पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे स्फोट झालेल्या ठिकाणापासून जवळच शाळा देखील आहे. महिनाभरापूर्वी जेव्हा डोंबिवलीत अशा प्रकारची घटना घडली होती, तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशा अतिधोकादायक कंपन्या अंबरनाथ ‘एमआयडीसी’मध्ये हलवणार असल्याचे सांगितले होते. ही प्रक्रिया कुठवर आली आहे? घटना घडल्या की फक्त मोठ्या घोषणा करायच्या आणि नंतर निवांत बसायचं, हे कुठवर चालणार? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी तातडीने या कंपन्या स्थलांतराबाबत आढावा बैठक घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा. या दुर्घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नसावी ही आशा, डोंबिवलीकरांनो काळजी घ्या.
फायर ऑफिसरची नेमणूक करणे गरजेचे - रवींद्र चव्हाण
एखादा उद्योजक मेहनत करून बँकांचे कर्ज घेऊन कंपनी उभी करतो. कोणत्यातरी निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असतात. एकंदरीतच कंपन्यांमध्ये सेफ्टी नॉम्स कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत. यासाठी यंत्रणा उभे करणे अत्यंत गरजेचे आहे. एखादा उद्योग उभा राहतो, त्यामध्ये फक्त उद्योगच उभा राहत नाही तर त्या भागातील सर्व परिसरात अनेकजण त्या उद्योगावर अवलंबून असतात. त्यामुळे स्थलांतरणाचा निर्णय घेताना यासर्व बाबींचा विचार होणे देखील गरजेचे आहे. १९७०-७१ च्या दरम्यान पहिल्यांदा एमआयडीसी या ठिकाणी आली. त्यानंतर आजूबाजूला नागरिकरण वाढले. एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांबाबत सरकार आणि संबंधित विभागाने उपाययोजना तसेच फायर ऑफिसर याची नेमणूक करणे, दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री) यांनी म्हटले आहे.
कंपनीत प्रशिक्षित कामगार नसल्याने आग लागल्यानंतर परिस्थिती कशी हाताळावी, हेच त्यांना समजत नाही. २३ मे रोजी अमुदान केमिकल कंपनीला आग लागल्याचे समजताच घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली होती. केमिकल कंपनी स्थलांतराबाबत सरकार लवकर निर्णय घेईल.- नंदू परब, जिल्हा सरचिटणीस भाजप कल्याण
शासनाची दुप्पटी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. स्फोट, जीवितहानी याकडे का कानाडोळा केला जात आहे. लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने याचे राजकारण न करता माणुसकीच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. - डॉ. प्रशांत इंगळे, प्रदेश महासचिव बसपा