Dombivli News : डोंबिवली हत्या प्रकरण, पोलिसांनी १२ तासांत लावला छडा

मृतदेहाच्या बाजूला एक टोपी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. याच धागा पकडून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली
Dombivli News :  डोंबिवली हत्या प्रकरण, पोलिसांनी १२ तासांत लावला छडा
Published on

पश्चिम डोंबिवलीतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात इसमाची लाकडी दंडक्याने हल्ला करून हत्या केल्याची घटना घडली होती. विष्णूनगर पोलिसांना १२ तासात मारेकऱ्याला अटक करून गजाआड करण्यास यश आले. जेवणाच्या वादातून हि हत्या झाल्याचे पोलीस तपास उघड झाले. तर मृतदेहाजवळ पडलेल्या टोपीवरून पोलीस साक्षिदारापर्यत पोहोचले. साक्षीदाराने मारेकऱ्याची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसांनी काही तासात त्याला डोंबिवली पश्चिमेकडे कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदानातुन अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन आनंदा मोरे (३९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रेल्वे मैदानात क्रिकेटचे सामने सुरू होते. सामने संपल्यावर आयोजकांनी जेवण ठेवले होते. त्यावेळी नशेत धुंद असलेल्या आरोपी व त्याच्या मित्राने दोघांसाठी जेवण घेऊन मैदानाच्या एका बाजूला जेवत बसले. जेवताना त्याच्याजवळ आणखी एक नशेडी व्यक्ती जेवणासाठी आली, आरोपी अर्जुनने जेवण दोघांचेच असल्याचे सांगितल्यावर वाद सुरू झाला. तिघेही नशेत असल्याने त्यांना आपण काय बोलतोय, काय करतोय याचे भान नव्हते. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्यावर अर्जुनने बाजूला पडलेले लाकडी दंडके उचलून तिसऱ्याच्या डोक्यात मारले. यात तो जागीच निपचित पडला. मात्र अर्जुनच्या मित्राने त्याचा हात पकडून खाली पडलेल्या इसमाला मारहाण करू नकोस असे सांगितले. मात्र अर्जुन नशेत असल्याने त्याने मित्राचे ऐकले नाही. जमिनीवर पडलेल्या इसमाच्या डोक्याच्या पाठीमागे लाकडी दांडक्याने आणखी जोरदार फटका दिला. आपण एकाची हत्या केल्याची जाणीव अर्जुन नव्हती. अर्जुन त्या ठिकाणाहून निघून गेला असला तरी त्याचा मित्र त्याच जागेवर काही वेळ बसला होता. अर्जुनच्या मित्राने एवढी नशा केली होती की आपण मृतदेहाच्या बाजूला रात्रभर झोपल्याचे माहितीही पडले नाही. सकाळी उठून पाहिल्यावर अर्जुनच्या मित्राला आपल्या बाजूला मृतदेह पडला असून त्याची हत्या आपल्या साथीदाराने केल्याची आठवले.

दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास विष्णूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांना अर्जुनचा साथीदार दुरून पाहत होता. मृतदेहाच्या बाजूला एक टोपी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. याच धागा पकडून पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. पोलिसांनी रेल्वे मैदानात आणि आजूबाजूकडील परिसरात चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी टोपी घालणाऱ्या अर्जुनच्या मित्राची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अर्जुनचा मित्र राकेश पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. आपलीच टोपी असल्याची कबुली पोलिसांकडे दिली. सोमवारी रात्री घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अर्जुनने हत्या केली असून तो डोंबिवलीच फिरत असावा अशी माहिती पोलिसांना दिली. सफेद रंगाचा टीशर्ट आणि काळी हाफ पॅन्ट घातलेल्या अर्जुनचा शोध घेत असताना अर्जुन भागशाळा मैदानात झोपलेला दिसला. पोलीस त्याच्याजवळ गेल्यावर त्याने सुरुवातीला घाबरलेला असल्याने काहीच बोलला नाही. मात्र आपण एकाचा जीव घेतल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे पोलिसांना दिसले. नशेत आपण एकाची हत्यार केल्याचे अर्जुनने पोलिसांकडे कबुली दिली. अर्जुनाला अटक करून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी अर्जुनला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अर्जुनाला पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेल्वे मैदानात ज्या इसमाची हत्या झाली आहे त्याची ओळख अद्याप पोलिसांना लागली नाही. पोलीस तपास सुरू असून लवकरच त्याचे नाव व इतर माहिती मिळेल असे डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले

सदर कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनी पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) राहुलकुमार खिल्लारे, पोलीस निरीक्षक ( प्रशासन ), मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनी गणेश वडणे, पोउपनिरीक्षक कुलदीप मोरे, पो उपनिरीक्षक एम.बी.कपिले, आंधळे, सुभाष नलावडे, मनोज सावंत, पोलीस हवालदार शकील जमादार, कैलास घोलप, युवराज तायडे, थोरात, पोलीस नाईक कुरणे, भोई, पोलीस शिपाई कुंदन भोमरे, रायसिंग, कमोदकर यांनी बजावली.

logo
marathi.freepressjournal.in