
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील दोन गटांमध्ये शनिवारी रात्री जोरदार राडा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. केडीएमसीचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या समर्थक व मेघराज तुपांगे यांच्या गटात झालेल्या या वादात ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अजय गोलतकर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे व अशोक म्हात्रे या चौघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते मिलिंद देशमुख यांच्या कार्यालयात माजी नगरसेवक विकास म्हात्रे शनिवारी रात्री कामानिमित्त गेले होते. त्याच वेळी मेघराज तुपांगे देखील तेथे आले. या ठिकाणी म्हात्रे यांचा पोलीस अंगरक्षक आणि तुपांगे यांच्यात वाद झाला. त्यामुळे विकास म्हात्रे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र त्याचदरम्यान राजूनगर येथील खंडोबा मंदिराजवळ दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.
या घटनेत दोन्ही बाजूंनी प्राणघातक हल्ल्याचे आरोप झाले आहेत. विकास म्हात्रे यांनी आरोप केला की, तुपांगे गटाने त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला असून त्यांना आणि त्यांच्या अंगरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे मेघराज तुपांगे यांनी आरोप केला की, म्हात्रे यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर आणि त्यांच्या मित्रांवर तलवार, रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला झाला. या झटापटीत त्यांची चेन चोरी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी मेघराज तुपांगे यांच्या तक्रारीवरून ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर आणि अखिल निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.