डोंबिवली एसटी थांबा बनले अनधिकृत पार्किंग; प्रवासी वर्गात नाराजी

डोंबिवली पूर्वेकडील शिवम रुग्णालयाच्या उजव्या बाजूला वळण घेल्यानंतर पुढे एसटी थांबा आहे.
डोंबिवली एसटी थांबा बनले अनधिकृत पार्किंग;
प्रवासी वर्गात नाराजी
PM
Published on

डोंबिवली : डोंबिवलीतील एकमेव एसटी बस थांबाची जागा मोठी असल्याने याचा फायदा काही बेशिस्त वाहनचालकांकडून घेतला जात आहे. या जागेत चार पाच दिवसांपासून अनधिकृत पार्किंग केली जात आहे. या परिस्थितीमुळे एसटी थांब्यात एसटी प्रवेश करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एरवी या थांब्याकडे लक्ष नसल्याने नवीन दुचाकी शिकणाऱ्यांना ही जागा सोयीस्कर झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ व्यवस्थापणाकडून पाहणी करण्याची मागणी होत आहे.

डोंबिवली पूर्वेकडील शिवम रुग्णालयाच्या उजव्या बाजूला वळण घेल्यानंतर पुढे एसटी थांबा आहे. ही जागा मोठी असल्याने या जागेचा ताबा जणू दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी घेतल्याचे दिसते. प्रवासी वर्गात याबाबत नाराजी असून,  याबाबत येथील एसटीला आत येण्यास आणि बाहेर जाण्यास अडचण येत असते. अनधिकृत पार्किंगबाबत येथील बसचालक व वाहनचालक यांनी अद्याप एसटी महामंडळ व्यवस्थापणाकडे तक्रार केली नसल्याचे प्रवासी वर्गात बोलले जात आहे. चार पाच दिवसांपासून या जागेवर दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग संख्या वाढली आहे. याबाबत मनसेचे पदाधिकारी रमेश यादव यांनी ही जागा पार्किंगसाठी नसून त्याबाबत एसटी महामंडळ व्यवस्थापणाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

डोंबिवली एसटी थांबा येथे प्रवासी वर्गाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच आजूबाजूकडील अस्वच्छ वातावरण यामुळे प्रवासी वर्ग संतापले आहेत. एसटी महामंडळ व्यवस्थापणाकडून याकडे लक्ष दिले गेले नाही. या जागेवर अनधिकृत पार्किंग होत असून, अशा वाहनांना दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in