सध्या ठाणे ते डोंबिवली अंतर कापायला दीड तास लागतो. वाहतुकीमुळे हा प्रवास ३ ते ४ तासांवरही जातो. पण, हा कालावधी लवकरच कमी होणार आहे. कारण डोंबिवली ते ठाण्याला जोडणाऱ्या माणकोली पुलाचे काम वेगाने सुरू आहे. तो पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते डोंबिवली प्रवास अवघ्या ३० मिनिटांवर येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिली.
डोंबिवलीच्या बाजूने रेतीबंदर, मोठागाव व भिवंडीच्या बाजूने माणकोली येथे माणकोली पुलाचे काम वेगाने सुरू आहे. हा पूल एप्रिल २०२३ पासून जनतेसाठी खुला केला जाईल, असे श्रीनिवास यांनी सांगितले.
माणकोली पुलाच्या सद्यस्थितीबाबत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची एमएमआरडीएच्या कार्यालयात ३ ऑक्टोबर रोजी बैठक बोलवली होती. या बैठकीला एमएमआरडीएचे सहआयुक्त विजय सूर्यवंशी, केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, आमदार बालाजी किणीकर, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
श्रीनिवास म्हणाले की, ‘‘माणकोली पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल २०२३ पासून या पुलाचे लोकार्पण केले जाईल.’’ माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, ‘‘२०१३ पासून या पुलाच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली. या पुलाच्या बांधकामासाठी आपण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. २०१४ पासून त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली. अनेक तांत्रिक अडचणींमुळे तसेच कंत्राटदाराला पुलाच्या आराखड्यात बदल करावे लागले. १८ सप्टेंबर २०१६ ला या पुलाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ३६ महिन्यात हा पूल पूर्ण होणार होता. एमएमआरडीएचे तत्कालिन आयुक्त यूपीएस मदान यांना १८ महिन्यांत हा पूल पूर्ण करण्यास सांगितले होते.
याबाबत आयुक्त श्रीनिवास म्हणाले की, ‘‘भिवंडी बाजूकडील भूसंपादनात तीन ते चार वर्षे गेली. काम संथगतीने सुरू असल्याने तो वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. तर दोन वर्षे कोरोनामध्ये वाया गेली.’’ सहा वर्षे होऊनही हा पूल न झाल्याने डोंबिवली व कल्याणच्या नागरिकांनी खंत व्यक्त केली.
तरीही अडथळे राहण्याची शक्यता
हा पूल तयार झाल्यावर मुंबई, नाशिकची वाहने थेट डोंबिवलीत येतील. वाहनांची संख्या वाढल्याने शहरात वाहतूककोंडी निर्माण होऊ शकते. कारण शहरातील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. ते रुंद करण्यासाठी माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी दीनदयाळ रोड, केळकर रोड रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी तो हाणून पाडला. माणकोली पूल सुरू झाल्यानंतर रेतीबंदर रेल्वे गेट व रिंगरोड तयार न झाल्यास वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागेल, असे डोंबिवलीतील रहिवासी राकेश सिंह यांनी सांगितले.