

दानिश आझमी/डोंबिवली :
इंदूर-पुणे एक्स्प्रेसच्या एसी डब्यात झोपलेल्या एका महिला प्रवाशाची बॅग चोरून, नंतर तिच्या एटीएम कार्डचा वापर करून ८० हजार रुपये लांबवल्याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) गुजरात येथील दोन पुरुषांना अटक केली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.
मुकेश कांतिलाल पुरोहित आणि मुकेश राज पुरोहित अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत.
ही महिला इंदूर-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करत होती. वसई ते भिवंडी दरम्यान ट्रेनमध्ये तिला झोप लागली. याच दरम्यान आरोपींनी डब्यातून तिची बॅग चोरल्याचा आरोप आहे.
चोरी झालेल्या बॅगमध्ये लॅपटॉप, आयफोन, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. आपले सामान गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने डोंबिवली जीआरपी गाठून तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, चोरीच्या एटीएम कार्डचा वापर करून ८० हजार रुपये काढण्यात आले आहेत. चोरीला गेलेल्या बॅगमध्येच एटीएमचा पिन ठेवला होता. ज्यामुळे आरोपींना पैसे काढणे शक्य झाले, अशी माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी एटीएम व्यवहारांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. या टोळीचा अन्य कोणत्या राज्यातील टोळीशी संबंध नाही ना? याची पडताळणी पोलीस करत आहेत.
दोन्ही आरोपी गुजरातचे
दोन्ही आरोपी गुजरातमध्ये मोबाईलच्या दुकानात काम करतात. मोबाईलचे साहित्य खरेदीसाठी मुंबईत आले असल्याचे पोलिसांना समजले. परत जात असताना त्यांनी झोपलेल्या प्रवाशाला लक्ष्य करून चोरी केली.