डोंबिवलीत मतदार यादीत घोळ! गुजराती भाषेत नावे, बाहेरील मतदारांचीही नावे घुसवली; शिवसेना माजी नगरसेवकाचा आरोप

डोंबिवलीत मतदार यादीत घोळ! गुजराती भाषेत नावे, बाहेरील मतदारांचीही नावे घुसवली; शिवसेना माजी नगरसेवकाचा आरोप

लोकसभेची निवडणूक जवळ असताना मतदार यादीत चूक झाली असून, डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीने निवासी प्रभागात भलत्याच प्रभागातील नागरिकांची नावे आहेत.

डोंबिवली : लोकसभेची निवडणूक जवळ असताना मतदार यादीत चूक झाली असून, डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीने निवासी प्रभागात भलत्याच प्रभागातील नागरिकांची नावे आहेत. यात मतदार यादीत काही नावे ही गुजराती भाषेतून दिली असल्याची दिसत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यात गुजराती भाषेला इतके महत्त्व का दिले जात आहे? असा प्रश्न शिवसेनेचे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदासंघाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात डोंबिवली पूर्वकडील एमआयडीसी निवासी प्रभाग याद्यांची छाननी केली असता त्यात शंभरावर जास्त नावे ही प्रभागातील नागरिकांची नसल्याचे पाहण्यास मिळाले आहेत. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदर मतदार याद्यांतील नावे व त्याच्या पत्त्यावर जागेवर जाऊन बघितले असता, सदर व्यक्ती तेथे राहत नसल्याचे दिसण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने याबाबतीत मतदार नोंदणी अधिकारी, कल्याण ग्रामीण विधानसभा यांच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नोंदणी रद्द करून कारवाई करा

प्रभाग बाहेरील नागरिकांची मतदार नोंदणी करताना दिलेल्या कागदपत्राची सखोल चौकशी करून जर ते बोगस खोटे दिल्याचे सिद्ध झाले, तर त्यांची मतदार नोंदणी रद्द करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांचे एक शिष्टमंडळ हे मतदार नोंदणी अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतील, असे सांगण्यात आले.

यादीत बरीच नावे दोनदा!

मतदार यादीत बरीच नावे ही दोनदा आली आहेत. तसेच काही मृत व्यक्तींची नावे पण आहेत. सदर ही नावे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा मतदार याद्यांमुळे मतदानाचा टक्का वाढणार कसा?असा प्रश्न माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in