डोंबिवली : ट्रेनमध्ये चढताना एक महिला प्रवासी फलाट आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकल्याचा प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडला. रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने वीस मिनिटांनंतर त्या प्रवासी महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी वर्गाला ट्रेनमध्ये चढताना तारेवरची कसरत करावी लागते. सोमवारी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वर सकाळी ८.३३ वाजता जलदगतीच्या ट्रेनमध्ये चढताना एक प्रवासी महिला फलाट आणि ट्रेनच्या गॅपमध्ये अडकली. हे पाहून फलाटावरील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. ट्रेन थांबवल्यानंतर डोंबिवली रेल्वे पोलीस आणि प्रवाशांच्या मदतीने वीस मिनिटांनी त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. या महिलेला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.