

डोंबिवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला, विद्यार्थिनींनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि ‘कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, महिला भगिनी आदींनी एकत्र येत सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. याआधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिली.
सांगलीत ७ हजार ३३८ महिलांनी रचला होता विक्रम
त्या ठिकाणी याआधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिके सादर करून महिलांनी तो रेकॉर्ड केला. त्यावेळी डांगरेकर यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट, मेडल हस्तांतरित केले. त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी शारीरिक व्यायामावर भर देऊन जगासमोर सशक्त भारत कसा असू शकतो हे दाखवून देण्याचा संकल्प।सोडला होता, त्या निमित्ताने महिला, विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारतमातेच्या चरणी समर्पित करतो, असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले. कल्याण तालुका शारीरिक।शिक्षण समितीचे त्यांनी आभार मानले, शिक्षक, विद्यार्थी आदींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दणाणला
सारा आसमंत ‘भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरम’ अशा घोषणांनी दणाणून गेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा आनंद ओसंडून वहात होता.
लेझीमचा झंकार सर्वत्र निनादत होता, ढोल-ताशांच्या गजरात त्या रेकॉर्डचे हजारो डोंबिवलीकरांनी स्वागत केले, प्रत्येकाच्या सहभागाबद्दल कौतुक करण्यात आले. अशा देदीप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासून डोंबिवलीकर प्रतीक्षेत होते, अखेर वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा होताच प्रचंड जल्लोषात त्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.