

डोंबिवली : जुन्या वादातून साहिल गायकवाड या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील तेलकोसवाडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून काही तरुणांनी साहिलवर हल्ला केला. यावेळी त्याच्या छातीत चाकूने वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हर्षद गिरी (२०), दिशांत गायकवाड आणि कमलेश मोकल या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत सहभागी असल्याच्या संशयावरून अन्य दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे करत आहेत.