भिवंडी : भिवंडी महानगरपालिका संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची प्रभूआळी येथील इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीतील हे वाचनालय गेल्यावर्षी बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे वाचनालय मिल्लत नगर येथे मनपा संचलीत रमजान नब्बू वाचनालयात स्थलांतरित करण्यात आले. मात्र तेथे देखील पावसाचे पाणी शिरल्याने अखेर वाचनालयातील पुस्तके मिल्लत नगर येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आली आहेत. या घटनेने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाचकांनी संताप व्यक्त करून मनपा प्रशासनाला दोष दिला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या भिवंडी नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सन १९९१ साली हे वाचनालय सुरू करण्यात आले होते. पालिकेने सुरू केलेले वाचनालय ३३ वर्षे जुने असून ते प्रशस्त होते. या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली संदर्भ पुस्तके, कादंबऱ्या, चरित्रे आणि ५० हजारांहून अधिक पुस्तके असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या इमारतीवर असलेल्या पत्र्यांची दुरुस्ती आणि देखभाल न केल्याने छत व भिंतीतून पाणी गळतीमुळे वाचनालयातील अनेक पुस्तके खराब झाली. या वाचनालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अभ्यासासाठी येत असत. तेथे देखील इमारतीमध्ये पावसाचे पाणी येऊ लागल्याने जवळच असलेल्या मनपाच्या आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. महापालिकेकडे इमारतीची जागा नसल्याने या वाचनालयासाठी प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातील पुस्तके मिल्लत नगर येथील महापालिकेच्या रमजान नबू मोमीन वाचनालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्या वाचनालयातही पाणी शिरले होते. त्यानंतर ही पुस्तके मिल्लत नगर येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात ठेवण्यात आली आहेत.
- स्नेहल पुण्यार्थी, ग्रंथालय प्रमुख