नालेसफाईचे बजेट ६ कोटींवरून ८ कोटींवर : ठेकेदारांपुढे प्रशासन नरमले

पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होवू नये, यासाठी दरवर्षी कोट्यवधी खर्चून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र,यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला शुन्य प्रतिसाद मिळाल्याने वारंवार निविदा प्रक्रिया राबविण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे.
नालेसफाईचे बजेट ६ कोटींवरून ८ कोटींवर : ठेकेदारांपुढे प्रशासन नरमले

ठाणे: पावसाळा तोंडावर असताना नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी ठेकेदारांपुढे ठाणे महापालिका प्रशासन नरमले असून नालेसफाईच्या बजेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ६ कोटी ७७ लाखांच्या बजेटची तरतूद करण्यात आली होती. हे बजेट आता ८ कोटींपर्यंत करण्यात आले आहे.

पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती निर्माण होवू नये, यासाठी दरवर्षी कोट्यवधी खर्चून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र,यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला शुन्य प्रतिसाद मिळाल्याने वारंवार निविदा प्रक्रिया राबविण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे. गेल्या दोन वर्षातील बिले अदा न झाल्याने तसेच यावर्षी नालेसफाईच्या बजेटमध्ये तब्बल २० ते ३० टक्क्यांनी घट केल्याने पाच वेळा निविदा देऊनही दोन प्रभाग समिती वगळता एकही ठेकेदाराने निविदा भरली नसल्यामुळे नालेसफाईचा प्रश्न अधांतरी राहिला आहे.

दुसरीकडे २०२२-२३ या आर्थिक वर्षात नालेसफाईचे बिले मिळाली नसल्याने यंदा नालेसफाईचे काम करताना पैसे कुठून आणायचे असा प्रश्न ठेकेदारांना भेडसावत आहे. त्यामुळे यावर्षी नालेसफाईसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी ठेकेदारांकडे पैसेच नसल्याने निविदा भरायची कशी असा प्रश्न ठेकेदारांना पडला आहे. वागळे आणि लोकमान्य -सावरकर नगर या दोन प्रभाग समितीमधील नालेसफाईच्या कामासाठी प्रतिसाद आला असून उर्वरित सात प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईची कामे वेळेवर कशी सुरू करायची असा प्रश्न ठाणे महापालिका प्रशासनाला पडला होता.

यंदा नालेसफाईचे बजेट ६ कोटी ७७ लाखांहून थेट ८ कोटी करण्यात आले आहे. बजेट वाढवण्यात आल्याने निविदा प्रक्रियेला आता तरी प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे बजेट वाढवले असल्याने आता नालेसफाईची कामे देखील वेळात सुरु होतील असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

शहरातील नाल्यांची स्थिती

ठाणे महापालिका क्षेत्रात ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. मुंब्य्रात ३१ किलोमीटर लांबीचे ९२ नाले आहेत. कळव्यात ९ किलोमीटरचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किलोमीटरचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किलोमीटर लांबीचे २५, मानपाडा १७ किलोमीटरचे २६, नौपाडा येथे साडेचार किलोमीटरचे २४, वागळे इस्टेटमध्ये ८ किलोमीटरचे २०, उथळसरमध्ये साडेसात किलोमीटरचे २४ आणि कोपरीत ४ किलोमीटर लांबीचे ११ नाले आहेत.

२०२२ची ७ कोटींची बिले अदा

नालेसफाईची २०२२ या आर्थिक वर्षातील बिले ठेकेदारांना अदा न झाल्याने नालेसफाईच्या यावर्षीच्या कामांत ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे स्वारस्य दाखवले नव्हते. मात्र प्रशासनाकडून २०२२ ची ७ कोटींची बिले अदा करण्यात आली असून २०२३ या आर्थिक वर्षातील अर्धी बिले देखील अदा करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in