ठाणे : इडली-डोसा हा सांबारशिवाय खाण्यात मजाच नाही. मात्र सांबारातील प्रमुख घटक असलेल्या शेवग्याच्या शेंगांचे दर तब्बल ४०० रुपये किलोवर पोहोचल्याने आता सांबारचेही दर वाढणार असल्याची माहिती उडुपी हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
यंदा राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत अनेक पिके शेतातच सडून गेली. परिणामी त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर झाला असून अनेक भाज्यांचे दर सध्या भडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रक्तदाब, सांधेदुखी आदींसाठी उपयुक्त आणि व्हिटामिन्सने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या शेंगा तर अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत.
बदलत्या हवामानाचा फटका शेवग्यालाही बसला असून नवीन पिकाचा हंगामही लांबला आहे. ठाण्यात शेवगा सहज उपलब्ध नाही.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मात्र शेवगा मिळतो. परंतु दर तब्बल ४०० रुपये प्रति किलो असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी केवळ उडुपी हॉटेल व इतर व्यावसायिकच शेवग्याची खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
थंडीच्या दिवसांत शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी मानल्या जातात. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही त्याला प्राधान्य दिले जाते. मात्र कमी झालेल्या आवकीमुळे दर गगनाला भिडले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आवक कमी असल्यानेच ४०० रुपये किलो हा दर स्थिरावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.