वऱ्हाळदेवी तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा प्रशासनाचे दुर्लक्ष ; नागरिकांची कारवाईची मागणी

तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली
File Photo
File Photo

शहराची तहान भागवणाऱ्या प्रसिद्ध वऱ्हाळ देवी तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपला अड्डा बनवला आहे. या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी आयोजित केली जाते. इतकेच नाही, तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. दरम्यान, असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा महापालिका प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

याबाबत भिवंडी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी सांगितले की, धामणकरनाका ते मानसरोवर - कामतघर दरम्यान शेकडो एकरमध्ये वऱ्हाळ देवी तलाव पसरलेला असून त्याभोवती महापालिकेने नागरिकांना चालण्यासाठी व बसण्यासाठी उद्यान तयार केले आहे; मात्र सदर ठिकाणी मद्यपी बाहेरून दारू आणि इतर खाद्यपदार्थ आणून तलावाच्या बागेत दारू पिण्यात गुंग होतात. दारूच्या सामुग्रीसह दारू पिणाऱ्यांची पार्टी होते. दारू पिण्यास बंदी असतानाही बेधडकपणे मानसरोवर ते कामतघर दरम्यान, रात्री ७ ते १२ वाजेपर्यंत दारू पिणारे मद्यपान संपवतात, तर अनेक जण दारूच्या बाटल्याही तलावात फेकतात. त्यामुळे तलावाच्या काठावर चौफेर दारूच्या बाटल्यांचा खच निर्माण झालेला आहे. त्यामुळे तलावात उतरल्यानंतर या फुटलेल्या बाटल्यांच्या काचांचा खच नागरिकांच्या पायात शिरत असल्याचे येथील परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.

उघड्यावर मद्य प्राशन करण्याबरोबरच तलावाचा परिसर दूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच तलावात पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. जी व्यक्ती व्यसन करताना आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. तलाव परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

- नवनाथ ढवळे, पोलीस उपायुक्त, भिवंडी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in