रोजगाराअभावी कातकरी मजूर ठरत आहेत वेठबिगारीचे बळी; रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विवेक यांची नाराजी

रोजगाराअभावी कातकरी मजूर ठरत आहेत वेठबिगारीचे बळी; रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विवेक यांची नाराजी

वाडा : मजुरांची वेठबिगारीतून मुक्तता केल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. वाडा तालुक्यातून भिवंडी येथे वेगवेगळ्या ठिकाणी वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना वेठबिगारीच्या जोखडात अडकवले होते. यावेळी मुक्त वेठबिगारांच्या आनंद त्यांच्या आनंदला पारावार उरला नव्हता. विवेक पंडित यांनी वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर, बिलघर, कोने, जांभूळ पाडा, जाळे या गावांमध्ये वेठबिगारीतून मुक्त केलेल्या मजुरांच्या घरी अधिकाऱ्यांसह जाऊन पाहणी केली.

वेठबिगारीच्या पाशात अडकलेले मजूर हे कातकरी या आदिम जमातीचे आहेत. परंतु सर्वात मागास असलेल्या कातकरी या जमातीकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, बँकेचे खाते, जातीचे दाखले इत्यादी महत्त्वाचे कागदपत्र नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शिवाय रोजगार हमी योजनेतून या मजुरांना काम मिळत नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना वीट उत्पादक किंवा इतर मालकाकडून पैशांची उचल (बायाना) करावी लागते आणि ते त्याची फेड करण्यासाठी हे मजूर वर्षानुवर्ष वेठबिगारीच्या कचाट्यात अडकतात. त्यामुळे या मुक्त करण्यात आलेल्या मजुरांना सर्व संबंधित कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत विवेक पंडित यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच यावेळी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत नाराजी देखील व्यक्त केली. तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि रोजगार सेवक यांची एकत्रित बैठक घेऊन रोजगार हमीच्या कामांची संख्या वाढवून जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार देता येईल याच्याबाबत बैठक घेण्याच्या सूचना देखील विवेक पंडित यांनी दिल्या. रोजगारासाठी सातत्याने होत असलेल्या स्थलांतरामुळे अनेक मुले शाळाबाह्य झालेली दिसून आली त्या मुलांना आश्रमशाळेत दाखल करण्याचे आदेश पंडित यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुक्त वेठबिगार मजूर उद्ध्वस्त

शिलोत्तर गावातील मनीषा झिपर सवर आणि तिचे कुटुंब तब्बल चार वर्षांनंतर गावी परतले होते. परंतु गावी परतल्यावर त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झालेले होते. त्यामुळे ती आपल्या मुलाबाळांसह येथील समाजगृहात रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे जाळे, जांभूळपाडा, कोने, बीलघर येथील मजुरांना देखील राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही असलेली घरे राहण्या योग्य नाहीत तसेच वीज पाणी अशा मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे या सर्व मुक्त वेठबिगार मजुरांना पंतप्रधान जनमन योजनेतून राहण्यासाठी पक्की घर बांधून देण्याचे तसेच, सर्व मूलभूत कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश विवेक पंडित यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in