ठाणे : लोकमान्य नगर परिसरात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना या धावपळीत हातगाडीचा धक्का लागून वृद्ध ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. हातगाडीचा धक्का लागल्यानंतर संबंधित व्यक्ती खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागला; मात्र अशा अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल न करता अतिक्रमण पथकाचे कर्मचारी त्यांना तिथेच सोडून गेल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णायात आणि त्यानंतर जे.जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मनोहर सहदेव महाडिक (६५) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते लोकमान्यनगर परिसरातच राहत असून, शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान ते भाजी आणायला लोकमान्य नगर येथील लाकडी पूल येथील मार्केटमध्ये गेले होते. यावेळी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी आल्याने फेरीवाल्यांची माल वाचवण्यासाठी नेहमीप्रमाणे पळापळी झाली. या धावपळीत महाडिक यांना एका हातगाडीचा धक्का लागला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला; मात्र त्यांना रुग्णालयात हलवण्याच्या ऐवजी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला असल्याचा आरोप महाडिक यांचे बंधू सतीश महाडिक यांनी केला आहे.