कर्जतमधील लालपरीच्या ‘ब्रेक’मुळे प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांची कोंडी; एसटी कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे एसटीला घरघर

ऐंशीच्या दशकात लालपरीमुळे दळणवळण करणे सोपे झाले होते. त्यानंतर तीनचाकी रिक्षा, खासगी वाहनांचा वापर सुरू झाला. कर्जतला त्याच सुमारास एसटी आगार सुरू झाले.
कर्जतमधील लालपरीच्या ‘ब्रेक’मुळे प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांची कोंडी; एसटी कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे एसटीला घरघर
Published on

विजय मांडे / कर्जत

ऐंशीच्या दशकात लालपरीमुळे दळणवळण करणे सोपे झाले होते. त्यानंतर तीनचाकी रिक्षा, खासगी वाहनांचा वापर सुरू झाला. कर्जतला त्याच सुमारास एसटी आगार सुरू झाले. तत्पूर्वी पनवेलहून कर्जतकरांना एसटीची सुविधा मिळत होती. अनेक वर्षे दुग्ध व्यावसायिक, चाकरमानी, विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लालपरी ही एकमेव साधन होती. काही वर्षांपूर्वी प्रवासाची इतर साधने, काही एसटी कर्मचाऱ्यांची मनमानी आदी कारणांमुळे एसटीला घरघर लागली. कोरोना काळात प्रवाशांसाठी असलेली एसटी मोठ्या प्रमाणात बंद होती. त्यामुळे नागरिकांचे जीवन एकप्रकारे ठप्पच झाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ही सुविधा बरेच महिने बंद होती. परिणामी प्रवाशांनी अन्य पर्याय निवडले आणि एसटीच्या अडचणींमध्ये भर पडली. त्याचा परिणाम खेड्यापाड्यात असलेल्या सामान्य जनतेवर झाला. अनेक गावांमध्ये एसटी जायची बंद झाली. तिला ब्रेक बसला आणि सर्वसामान्यांच्या बरोबरच विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे यांच्या प्रयत्नाने १६ ऑक्टोबर १९८० साली कर्जत एसटी आगार सुरू झाले. तत्पूर्वी पनवेल आगराच्या एसटी बस कर्जतला येत असत आणि रेल्वे स्टेशननजीकच्या एसटी स्टँडवरून बसचे नियोजन होत असे. कर्जत तालुक्यात गावोगावी एसटी जाऊ लागली. ग्रामीण भागातील जनतेला ती आपलीशी वाटू लागली. कारण त्यांची खरी जीवनवाहिनी एसटीच होती. तालुक्याच्या ग्रामीण भागातील दुग्ध व्यावसायिक याच लालपरीने मुंबईकडे जाण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकावर येत असत. एसटी सुरू झाल्याने मुलांच्या बरोबरीने मुलींचा शालेय शिक्षणाचा प्रवास सोयीस्कर झाला. त्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठीही लालपरीची खूप मदत झाली. आपल्यामुळेच हे सारे होत आहे, या अविर्भावात काही एसटीवाहक, चालकांच्या डोक्यात हवा गेली. त्यांची मग मनमानी सुरू झाली. मग 'हात दाखविला तेथे थांबा' अशी कल्पना सुरू झाली, त्यानंतर सहा आसनी रिक्षा आल्या. या वाहनाचे विशेष म्हणजे अगदी घरा शेजारी नेऊन ते सोडत असत. त्यामुळे एसटी बाजूला असली तरी प्रवासी सहा आसनी रिक्षेत बसू लागली आणि खऱ्या अर्थाने एसटीला घरघर सुरू झाली. कर्जत आगार कधीही बंद होईल. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र डिझेलच्या जागी सीएनजी आल्याने एसटी महामंडळाच्या डोक्यावरील ओझे खांद्यावर आले.

आमदारांनी लक्ष घालणे गरजेचे

कर्जत एसटी आगाराला ४५ वर्षांहून अधिक वर्षे झाली. त्यावेळी बांधलेल्या इमारती सुस्थितीत राहिल्या नाहीत. आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान सुद्धा कधी कोसळेल? याचा नेम नाही. कर्जत आगारात सीएनजी पंप सुरू झाल्याने येथील खासगी वाहनचालकांची सुद्धा सोय झाली आहे. आगाराचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in