उरण : ऑनलाईन टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याच्या आमिषामुळे एका व्यक्तीला तब्बल १९ लाख ४३ रुपयांचा गंडा घातल्याची घटना न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कस्थाला ससीकुमार (३४, रा. उलवे) असे या फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कस्थाला ससीकुमार यांना टेलीग्रामवरून हॉटेल बुकिंग करण्याचे प्रीपेड टास्क असून त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून टास्क पूर्ण केल्यास तुम्हाला चांगला मोबदला मिळेल असा मेसेज आला. सदर मेसेज वाचून एका वेबसाइटवर खाते उघडून टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला कस्थाला यांना त्यांच्या वॉलेटमध्ये काही फायदा झाल्याचे दाखविण्यात आले आणि काही पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर या व्यवसायात चांगला नफा मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कस्थाला यांनी २६ मार्चपासून ते ८ मार्चपर्यंत एकूण १९ लाख ४३ हजार ३८५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावरून त्यांनी दिलेल्या खात्यात भरले. त्यानंतर हॉटेल बुकिंग टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या नफ्याची रक्कम काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असता त्यांना ते काढता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींना फोन करून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे कस्थाला ससीकुमार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी याबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्हावाशेवा पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत.