गणेशोत्सव काळात श्रीफळाची मागणी ४० टक्क्यांनी वाढली

नारळ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता, यंदा मात्र शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडूनही श्रीफळाला मोठी मागणी होत आहे
गणेशोत्सव काळात श्रीफळाची मागणी ४० टक्क्यांनी वाढली

गत दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाशी संबंधित सर्वच व्यवसायांच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला होता. दोन वर्षांच्या खंडानंतर जव्हारमध्ये यंदा गणेशोत्सवात पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात गणेश उत्सव कालावधीत दररोज सुमारे १२ हजार पाचशे नारळांची विक्री होत आहे. गणेशोत्सवात नारळ विक्रीत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत २५ ते ३० रुपये झाली आहे.

तालुक्यात गेले दोन वर्ष गणेशोत्सवावर कोरोना संसर्गामुळे निर्बंध होते. त्यामुळे उत्सव काळात नारळ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता, यंदा मात्र शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडूनही श्रीफळाला मोठी मागणी होत आहे. गणेशोत्सवात भक्तीभावाने भाविक ‘श्रीं’ ना तोरण अर्पण करतात. गेली दोन वर्षे तोरणासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या नारळाची मागणी कमी होती. यंदा नव्या नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. यंदा उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने हॉटेल व्यावसायिक, कॅटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे.

जव्हार शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या गावांतील बाजारात दररोज नारळांची आवक होत आहे. एका पोत्यात शंभर नारळ असतात. दररोज १२ हजार पाचशे नारळ बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in