धुळीच्या वादळाचा तडाखा; ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये अचानक हवामान बदल, पाऊस

राज्यभरात गुरुवारी अचानक हवामानात मोठे बदल झाले आणि मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली भागात दुपारनंतर वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला.
धुळीच्या वादळाचा तडाखा; ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये अचानक हवामान बदल, पाऊस
धुळीच्या वादळाचा तडाखा; ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये अचानक हवामान बदल, पाऊस
Published on

मुंबई : राज्यभरात गुरुवारी अचानक हवामानात मोठे बदल झाले आणि मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली भागात दुपारनंतर वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. बदलापूर, अंबरनाथच्या काही परिसरात पाऊसही झाला. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये वादळामुळे धुराचे आणि धुळीचे लोट उडू लागले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. गेल्या काही दिवसांत अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल व नुकसानही झाले.

सायंकाळच्या सुमारास ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात अचानक मोठा बदल झाला. दुपारपर्यंत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी अचानक वादळी वारे वाहू लागल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या वाऱ्यांसोबतच शहरात धुळीचे प्रचंड लोट उसळल्याने दृश्यमानता कमी झाली असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात वारा सुटला. त्याचबरोबर काळोखही पसरला आणि धुळीचे लोट पाहायला मिळाले. याशिवाय लोणावळा आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांतही काही ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरूवारीदक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. तर कोकण-गोवा भागातील तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार काही भागांत सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या सरीही कोसळलेल्या दिसल्या.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यांवरील धूळ हवेत उडाल्याने सर्वत्र धुरकट वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण-शीळ फाटा रस्ता आणि घोडबंदर रोडवर धुळीमुळे वाहन चालवणे कठीण झाले होते. अचानक आलेल्या या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत, परिणामी काही मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती.

सुरक्षेचा उपाय म्हणून कल्याण आणि डोंबिवलीतील काही भागांमधील वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाला असून गाड्या धीम्या गतीने धावत आहेत.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

‘अतिशय गरज असल्यास आणि सुरक्षितता तपासूनच घराबाहेर पडावे. जुन्या इमारती, कमकुवत झाडे किंवा होर्डिंग्जच्या खाली उभे राहू नये,’ असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असला, तरी सध्याच्या वादळी स्थितीमुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी दुपारी मोठ्या संकटातून थोडक्यात बचावले. त्यांच्या हेलिकॉप्टरला खराब हवामानाचा फटका बसला. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडले. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर लगेचच सुरक्षितपणे खाली उतरवले. शिंदे एका नियोजित दौऱ्यासाठी निघाले होते. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरून उड्डाण झाले होते. हा दौरा कल्याण आणि मुरबाड परिसराचा होता. पण वादळी वाऱ्यामुळे कुठलीही जोखीम न घेता, हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

शिंदे हे  आपल्या पक्ष पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील लग्नकार्यासाठी मुंबईहून मुरबाडला जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३.३० वाजता महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून मुरबाडला जाण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र हेलिकॉप्टर जेमतेम ऐरोलीपर्यंत पोहोचताच समोरून येणारे वादळ पायलटने पहिले. संभाव्य धोका ओळखून पायलटने वेळीच याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना अवगत केले. तसेच पुढे जाण्याऐवजी मागे वळावे लागेल, असेही सांगितले. त्यानंतर त्याने तत्काळ हे हेलिकॉप्टर मागे वळवण्याचा निर्णय घेतला. पुढील काही मिनिटांत हे हेलिकॉप्टर जुहू येथील पवनहंस येथे यशस्वी लँड झाले.

logo
marathi.freepressjournal.in