मुंबई : वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धाडी टाकल्या. लोकांच्या वापरासाठी आरक्षित ६० एकर जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपाखाली मनी लाँड्रिंगसंदर्भात चौकशी करण्यासाठी या धाडी टाकल्याचे समजते.
ईडीच्या पथकांनी अनिल पवार यांच्या वसईमधील दिनदयाल नगर येथील निवासस्थानी तसेच मुंबई, पुणे आणि नाशिकमधील त्यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित १२ ठिकाणी छापे टाकले. शहराच्या विकास योजनेचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या जमिनीवर ४१ इमारतींच्या अनधिकृत बांधकामावरून ही चौकशी सुरू आहे. या कारवाईदरम्यान, ईडीच्या पथकाने पवार यांच्या कुटुंबियांच्या नाशिक येथील निवासस्थानातून सव्वा कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून काही कागदपत्रे आणि डिजिटल दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.
विशेष म्हणजे, २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या अनिलकुमार पवार यांना सोमवारी वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात वसईतील आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत सोमवारी औपचारिक निरोप देण्यात आला. अनिलकुमार पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. काल समारोप आणि सत्कार सोहळा पार पडल्यानंतर लगेचच मंगळवारी ईडीची कारवाई झाल्यामुळे वसईत व मनपा अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
अनिलकुमार पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानी सकाळी सात वाजल्यापासून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, चौकशी सुरू असताना ईडीचे पथक अनिलकुमार पवार यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या गाडीतून घेऊन गेले आहेत. त्यांना नेमके कुठे नेण्यात आले, याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. तर माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे बंगल्यातच असून त्यांची चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कारवाई सुरू होती.
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी अनिलकुमार पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सुमारे ६० एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे ४१ रहिवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात या भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपोचे आरक्षण होते. पण आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे.