डोंबिवलीत जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानपाडा पोलिसांच्या स्तुत्य कामगिरीचे अभिनंदन केले आहे.
डोंबिवलीत जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

५० कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदू बाबांनी बिल्डरला ५६ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानपाडा पोलिसांच्या स्तुत्य कामगिरीचे अभिनंदन केले आहे.

अंनिसचे राज्य पदाधिकारी प्रसाद खुळे आणि राजू कोळी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम लावून पैशांच्या पाऊस पाडणाऱ्या महेश गुरूजीसह अशोक गायकवाड, रमेश मोकळे या तिघांना जेरबंद केल्याबद्दल अंनिसतर्फे त्यांचे अभिनंदन केले.

डोंबिवलीतील बिल्डर सुरेंद्र पाटील यांच्याकडून ५६ लाख रुपये उकळून ५ कोटी रूपयांचा पाऊस पाडतो, सांगत त्यांच्या दावडी रोडला असलेल्या कार्यालयावरच्या घरात पुजा करून इमारतीभोवती ५ प्रदक्षिणा मारून येतो असे सांगून भोंदूबाबांनी ५६ लाखांची रोकड घेऊन पळ काढला. पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावीपणे वापर करून सदर फसवणूक प्रकरणातील भोंदूबाबासह तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. तर शर्मा गुरुजी व गणेश गुरुजी फरार असून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत.

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता समाजाच्या प्रबोधनाबरोबरच पोलिस अधिकाऱ्यांच्या सहकार्याची सुद्धा गरज आहे. त्यासाठी प्रसाद खुळे आणि राजू कोळी यांनी या कर्तव्यदक्ष पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी वपोनि शेखर बागडे यांना प्रसाद खुळे आणि राजू कोळी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्याची माहिती देऊन भविष्यामध्ये एकमेकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केल्याचे प्रा. देशमुख यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in