एकनाथ शिंदेंच राजकारणातील मोठे यश, ठाण्यातील रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत शिंदेंनी मारली बाजी

रस्त्यावर एकेकाळी एकनाथ शिंदे रिक्षा चालवत असत नंतर बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन ते शिवसेनेत कार्यरत झाले
 एकनाथ शिंदेंच राजकारणातील मोठे यश, ठाण्यातील रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत शिंदेंनी मारली बाजी

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नगरविकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. गेल्या अडीज वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी लोकाभिमुख निर्णय घेत राज्यातील नगरविकासाला आधुनिक आयाम देण्यास सुरूवात केली होती. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या एमएमआर विभागामधील वाहतुक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी महत्वाचे प्रकल्प सुरु केले आहेत. सर्वसामान्य रिक्षाचालक शिवसैनिक ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत शिंदे यांनी मजल मारली आहे.

ठाण्याच्या रस्त्यावर एकेकाळी एकनाथ शिंदे रिक्षा चालवत असत नंतर बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन ते शिवसेनेत कार्यरत झाले. त्यांनी शिवसेनेचा महत्वाचा शिलेदार म्हणून राजकारणात मोठे यश मिळवले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात आल्यानंतर त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण ठाण्यातील मंगला हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेजमधून घेतले.

शिंदे यांनी उपजीविकेसाठी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील मूळचे रहिवासी आहेत.

राज्यात २०१४ साली शिवसेना भाजप विधानसभा निवडणूक वेगवेगळे लढले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, मात्र १२२ जागा जिंकत तो सर्वात मोठा पक्ष झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे हाती घेतली. त्यावेळी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे समजले जाणारे विरोधीपक्ष नेतेपद कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ एकनाथ शिंदे यांच्या नावाला संमती दाखवली आणि राज्याचे नेतृत्व शिंदे यांच्याकडे चालून आले. सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरवात केली. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आणि न्याय मिळवून दिला. त्यानंतर काही महिन्यांनी शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाली आणि भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये एमएसआरडीसी कॅबिनेटमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांनी आरोग्य मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभारही शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला तो त्यांनी समर्थपणे सांभाळला. विशेष म्हणजे २०१९ साली राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नसताना जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारची चर्चा सुरु झाली. शिवसेनेच्यावतीने विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुखमंत्रिपदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली होती, त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या यादीत शेवटपर्यंत आघाडीवर होते. शेवटी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले मात्र या मंत्रिमंडळात नगरविकास हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मानाचे मंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र आता अडीच वर्षांनी भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद चालून आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in