कल्याण पूर्वेतील ३ हजार कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार? वालधुनी नदीपात्रातील भरावामुळे 
उद्भवणार पूरस्थिती

कल्याण पूर्वेतील ३ हजार कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार? वालधुनी नदीपात्रातील भरावामुळे उद्भवणार पूरस्थिती

विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर, कल्याण पूर्व तेथील वालधुनी नदीपात्रालगत सर्व नागरिक भयभीत झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात त्यांच्या घरादारात पावसाचे पाणी घुसून, अतोनात नुकसान होते...

कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर, कल्याण पूर्व तेथील वालधुनी नदीपात्रालगत सर्व नागरिक भयभीत झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात त्यांच्या घरादारात पावसाचे पाणी घुसून, अतोनात नुकसान होते, कुटुंबाची धावपळ, जनजीवन नेहमी विस्कळीत होत असते. अशा परिस्थितीत, त्यांना लागून असलेल्या नदीपात्राच्या समोरील बाजूस, महापालिकेचा, शासनाचा, भूखंड असून तो भूखंड बीओटी तत्त्वावर एका ठेकेदाराला देण्यात आलेला आहे. ठेकेदार आणि महापालिका यांनी मिळून, ठेकेदाराने महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून, सरळ नदीपात्र २०% पेक्षा जास्त बुजवून भूखंड वाढवण्यात येत आहे. यामुळे येथे दरवर्षी उद्भवते त्यापेक्षाही भयंकर पूरस्थिती उद्भवणार असून याचा फटका परिसरातील सुमारे ३ हजार कुटुंबांना बसणार आहे. त्यामुळे हे कुटुंब आगामी निवडणुकीत बहिष्कार घालण्याच्या पावित्र्यात असल्याचे समजते.

याबाबत संतप्त नागरिकांनी आंदोलन करून पाहिले, परंतु महानगरपालिकेने कुठलीही दाद घेतली नाही, शासनाने काही कारवाई केली नाही. राष्ट्रीय हरित लवादाकडे, दावा दाखल करण्याच्या संदर्भात माजी नगरसेवक उदय रसाळ हे प्रयत्न करीत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी, वालधुनी नदी आणि रहिवासी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एक रहिवासी यांची बैठक लावण्यात आली होती. या बैठकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उदय रसाळ यांना मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी राहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले परंतु कुणीच ठोस उपाययोजना केली नाही, सहकार्य केले नाही, त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालणार, मताधिकार बजावणार नसल्याचा ठराव राहिवासी यांनी एकमताने मंजूर केला. या परिसरातील, रहिवासी दर पावसाळ्यात प्रभावित होणाऱ्या रहिवासी कुटुंबांची संख्या ३ हजारच्या आसपास आहे.

हरित लवादाकडे तक्रार करणार

अवैध नदीपात्र बुजाविण्यात येत आहे. नदीपात्र वाचवण्याकरिता हरित लवादाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे रसाळ यांनी सांगितले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही रहिवाशांतर्फे निवेदन देऊन ते काम थांबविण्याबाबत सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येईल, असेही रसाळ यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in