ठाण्यात धावणार इलेक्ट्रिक डबलडेकर बस; तिकीट दरवाढ न करता ठाणे परिवहन सेवेचा ६९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

विनातिकीट प्रवास भोवणार ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंकुश घालण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने पाऊल उचलले आहे.
ठाण्यात धावणार इलेक्ट्रिक डबलडेकर बस; तिकीट दरवाढ न करता ठाणे परिवहन सेवेचा ६९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
Published on

ठाणे: ठाणे परिवहन सेवेचा २०२३ - २४ चा सुधारित ४२७.१९ कोटींचा आणि २०२४-२५ चे ६९४ कोटींचा मूळ अंदाजपत्रक गुरुवारी ठाणे परिवहन सेवेने सादर केले. या अंदाजपत्रकानुसार ठाणेकरांचा प्रवास येत्या काळात गारेगार आणि डबलडेकर इलेक्ट्रिक बसमधून होणार असून ठाणेकरांना डिजिटल तिकीट प्रणालीचाही लाभ होणार आहे. तर यंदा देखील तिकीट भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नसल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार होणार आहे. इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्याबरोबर कर्मचाऱ्यांची थकबाकी देणे आदींना प्राधान्य देण्यात आले आहे. तर फुकट्या प्रवाशांना चाप बसावा या उद्देशाने दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. गुरुवारी वागळे इस्टेट येथील परिवहनच्या सभागृहात परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी परिवहन सभापती विलास जोशी यांना सादर केला.

परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रिक बसपैकी ११४ बस ताफ्यात दाखल झाल्या असून उर्वरित बस या २०२४ अखेर दाखल होणार आहेत. ठाणेकरांना येत्या काळात डबलडेकर बसमधून प्रवासाची हमी परिवहन प्रशासनाने दिली आहे. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ४४६ बस असून आगामी काळात पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत १०० व एनसीएपी अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत ८६ पुढील आर्थिक वर्षात दाखल होणे अपेक्षित आहे. तसेच जेएनएनयूआरएमअंतर्गत प्राप्त झालेल्या १९० आणि ५० महिलांकरीता तेजस्विनी बस व १२३ इलेक्ट्रिक बस अशा मिळून ३६३ बस ठाणेकर नागरिकांना सेवा देत आहेत. आगामी दोन वर्षांत १८६ इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.

२०११ च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ही १८ लाख ११ हजार इतकी असून १ लाख लोकसंख्येस ३० बस या प्रमाणे आजमितीस शहराची अंदाजे लोकसंख्या सुमारे २३ लाख इतकी विचार घेता परिवहनला ७९३ बसची आवश्यकता असताना शहरात केवळ ३६३ बस धावत असल्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

डिसेंबर २०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू झाल्याने त्यापोटी व इतर थकीत द्यावी लागणाऱ्या फरकाच्या रकमेसह १२३ कोटी ८८ लाख इतकी रक्कम देणे प्रलंबित आहे. वाहनांचा विमा विधी विभागाकडील प्रलंबित विमा दावे व इतर सरकारी कर २ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. जीसीसी अदागी - जेएनएनयूआरएम अंतर्गत प्राप्त झालेल्या २४०, २६५ इलेक्ट्रिक बस अशा एकूण ५०५ बसच्या अदागीसाठी २१४ कोटी ३६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एनसीएपी अंतर्गत केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगानुसार बस वेट लिज तत्त्वावर घेण्यासाठी ४१ कोटी ८७ लाख प्राप्त होणाऱ्या अनुदान रकमेची जमा व खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

विनातिकीट प्रवास भोवणार ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंकुश घालण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार यापूर्वी विनातिकीट प्रवास केल्यास १०० रुपये दंड आकारला जात होता. मात्र आता त्यात दुपट्ट वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून ही रक्कम २०० एवढी करण्यात आली आहे. तसेच तिकीट भाडेही त्यात वसूल केले जाणार आहे. ठाणे महापालिकेकडून ४५२ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा ठाणे परिवहन सेवेने पुन्हा एकदा अनुदानासाठी महापालिकेकडे हात पसरले आहेत.

परिवहनच्या ताफ्यात मिडी बस येणार

कोलशेत, आनंदनगर, दिवा, विटावा, गावदेवी, पातलीपाडा, बस टर्मिनस विकसित करण्याबाबत रक्कम २० कोटी भांडवली कामे या स्वरूपात तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीचे स्त्रोत प्रवासी संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न, परिवहनच्या ताफ्यात मोठ्या संख्येने मिडी बस घेऊन शहरी व ग्रामीण भागात सोडल्या जाणार आहेत. असे मार्ग सेवा पाहणी करून त्यामार्गांवर बस फेऱ्यांचे नियोजन, खासगी बसचा वापर करण्याऐवजी परिवहनच्या बसचा वापर करण्याबाबत डिजिटल माध्यमातून आवाहन, सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना व स.वा. निरीक्षक या पदाचा पदभार देऊन मार्ग तपासणी कार्यक्रमावर भर दिला जाणार.

महसुली खर्चाबाबत वेतन व भत्ते खर्च

टीएमटीमधील अधिकारी, कर्मचारी वेतन व निवृत्तीधारकांचे पेंशन, थकबाकी व इतर अदागीसाठी ३६४ कोटी ५७ लाख व इतर प्रशासकीय खर्चासाठी २ कोटी १० कोटी इतकी तरतूद सेवानिवृत्ती निधीबाबत - डिसेंबर २०२३ अखेर एकूण १०३३ निवृत्तीधारक व जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत आणखी १४३ कर्मचारी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यांना उपदान, रजावेतन व मासिक निवृत्तीवेतन असे सरासरी ५२.९८ कोटी खर्च अपेक्षित, २०२४-२५ या आर्थिक वर्षात निवृत्तीवेतन व उपदान अदागीपोटी अंदाजपत्रकात मागणी करण्यात आली आहे. तसेच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व रजा वेतन यासाठी २३ कोटी २२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वाहन दुरुस्ती व निगासाठी ९ कोटी ४२ लाख, सीएनजी ६ कोटी ५४ लाख व वंगण खरेदीसाठी ७० लाख, डिझेल खरेदीसाठी १५ कोटी ३१ लाख, सरकारी कर ८ कोटी २० लाख इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

वाहतुकीपासूनचे अपेक्षित उत्पन्न

परिवहनच्या ताफ्यातील ४५ बसपोटी १४ कोटी १९ लाख, जेएनएनयुआरएम अंतर्गत १९० बसपोटी ६२.७१ कोटी, वातानुकूलित व्होल्वो १५ बसपोटी ५ कोटी ५३ लाख, ५० तेजस्विनी बसमधून १२ कोटी ३६ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. १२३ इलेक्ट्रिक बसपोटी ३६.६९ कोटी, पीएम योजनेंतर्गत १०० बसपोटी १६ कोटी ३८ लाख, मिडी २० सीएनजी बसपोटी ४ कोटी ६३ लाख तसेच ४२ इलेक्ट्रिक बसपोटी ५ कोटी ९१ लाख असे १५८ कोटी ४० लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे, तर जाहिरात, पोलीस ग्रॅन्ट व ठामपाकडून दिलेल्या सवलतीपोटी अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवासात देण्यात येत असलेली सवलत २०२२-२३ या वर्षात २१ ऑक्टोबर २०२२ पासून शासनाकडून बंद करण्यात आली आहे. परंतु २०२८-१९ ते २१ ऑक्टोबर २२ सवलत बंद केल्याने प्रलंबित रक्कम परिवहनला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

परिवहनच्या विशेष सुविधा

ठाणेकरांसाठी डिजिटल तिकीट प्रणाली

गारेगार प्रवासाचा अनुभव

कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्याचा प्राधान्य

इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविणार

दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ

दोन वर्षात १८६ इलेक्ट्रिक बस दाखल होणार

सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी २३ कोटी २२ लाखांची तरतूद

७९३ बसची आवश्यकता असतांना शहरात केवळ ३६३ बस

logo
marathi.freepressjournal.in