
एकीकडे वीजेचे बिल वाढत आहे, महावितरणकडून पुरविल्या जाणाऱ्या वीजेचा लपंडाव सुरू आहे अशातच अाता महावितरणकडे नवे वीजमीटर नसल्याची बाब समाेर आली आहे. बदलापूर येथे वीजमीटर मिळवण्यासाठी रीतसर अर्ज करून व त्यासाठीचे शुल्क भरूनही नागरिकांना वीजमीटर मिळत नाहीत. त्यामुळे वीज ग्राहकांत संतापाचे वातावरण आहे. तर वीजमीटर उपलब्ध होताच ग्राहकांना ते देण्यात येणार असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत.
बदलापूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वीजमीटरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत नवीन वीजमीटर जोडणीसाठी सुमारे अडीच हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये काहींनी ऑनलाइन पद्धतीने तर काहींनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. या नागरिकांनी पाच-सहा महिन्यांपूर्वीच वीजमीटरसाठी लागणाऱ्या शुल्काचा भरणाही महावितरणकडे केलेला आहे. असे असताना वीजमीटर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना घरगुती वीजमीटर उपलब्ध होत नसताना काही बांधकाम व्यावसायिकांना मात्र त्यांच्या नव्या इमारतींसाठी वीजमीटर उपलब्ध होत असून महावितरणचेच काही कर्मचारी कम मीटर कॉन्ट्रॅक्टर ही कामे करीत असल्याचाही आरोप होत आहेत. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी महावितरणचे बदलापूर पूर्व विभाग कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या आरोपाचा इन्कार करून त्यात तथ्य नसल्याचे सांगितले. मात्र सध्या वीजमीटर उपलब्ध होत नसल्याचे मान्य करून वीजमीटर उपलब्ध होताच ते ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान महावितरणच्या कारभारावर येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्युत पुरवठा याेग्य प्रकारे हाेत नसतानाही भरमसाठी बील आकारले जात असल्याचे बाेलले जात आहे.