मांडा परिसरात १० लाखांची वीजचोरी उघडकीस

मुरबाड पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारीला २३ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मांडा परिसरात १० लाखांची वीजचोरी उघडकीस

कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा परिसरात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या २३ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. मांडा शाखा कार्यालयांतर्गत दळवी चाळ, हमजद चाळ, मोहेली रोड, साई हेवन चाळ, सोईल भाई चाळ, उंबारणी रोड, शिफा चाळ, इर्शाद चाळ, चव्हाण चाळ, फरहान चाळ, यास्मिन चाळ, अन्सारी चाळ आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यात २३ जणांकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत‍ नोटीस बजावण्यात आली. परंतु विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने मांडा शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात ८ फेब्रुवारीला २३ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in