मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटी पद्धतीविरोधात उल्हासनगरमध्ये एल्गार!

एकंदरीत मनुष्यबळ पुरवठा कंत्राटातील भ्रष्टाचाराविरोधात राज्यात एका मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, अशी आमची खात्री झालेली आहे.
मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटी पद्धतीविरोधात उल्हासनगरमध्ये एल्गार!
Published on

उल्हासनगर : शासनातील मनुष्यबळ पुरवठा कंत्राटी पद्धतीविरोधात कायद्याने वागा लोकचळवळीने राज्यव्यापी एल्गार पुकारला असून, येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत या शासनमान्य वेठबिगारीविरोधात राज्यभर रान उठवणार असल्याचे कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते व लेबर राइटचे संस्थापक राज असरोंडकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा माणसांच्या अपव्यापारास म्हणजेच खरेदी विक्रीस, गुलामीस विरोध होता. त्यामुळेच शासनाला शिवरायांच्या धोरणाची आठवण करून देण्यासाठी शिवजयंतीदिनी हा एल्गार पुकारला गेला, कायद्याने वागा लोकचळवळीने शिवजयंती निमित्ताने उल्हासनगरात शिवकल्याण रॅलीचे आयोजन केले होते. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार व त्यांची लोकाभिमुख धोरणं यांची माहिती देणारे फलक या रॅलीत झळकत होते. आजवर शिवजयंतीचा वापर राजकीय शक्तिप्रदर्शन किंवा धार्मिक उन्मादाकरिता करण्यात आला, परंतु नव्या पीढीला खरे शिवाजी महाराज कळले पाहिजेत, शिवाय शिवाजी महाराजांची धोरणे आणि त्यांचे नाव घेऊन सत्तेत येणारे राजकारणी यांच्यातला फरक लोकांना कळला पाहिजे, हा देखील रॅलीचा उद्देश असल्याचे राज असरोंडकर यांनी सांगितले.

उल्हासनगर महानगरपालिकेत ६ कंत्राटदारांना केवळ एका वर्षात देयकापेक्षा जास्त दिलेल्या १ कोटी ३५ लाख इतक्या रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचे स्वतः प्रशासनानेच एका चौकशी अहवालात मान्य केले आहे. कंत्राटाच्या संपूर्ण कालावधीचा विचार केला व सर्वच कंत्राटदार चौकशीखाली घेतले तर गेल्या दहा वर्षांत अंदाजित २५ कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल. संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा हा आकडा ५०० कोटींहून अधिक असेल व त्या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालकांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

एकंदरीत मनुष्यबळ पुरवठा कंत्राटातील भ्रष्टाचाराविरोधात राज्यात एका मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, अशी आमची खात्री झालेली आहे. सदरचा विषय केवळ कामगारांच्या हक्कांपुरता मर्यादित नसून तो युवा पिढीच्या शिक्षणाचा आणि त्यासाठी राब राब राबणाऱ्या त्यांच्या पालकांच्या मेहनतीचा अपमान आहे, कुचेष्टा करणारा आहे, असे आमचे मत आहे. त्या विरोधातील राज्यभर जनजागृती, पत्रव्यवहार, जिथे जिथे गरज भासेल तिथे आंदोलने अशी मोहीम आम्ही आजपासून सुरू करीत आहोत.

-राज असरोंडकर, कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते

logo
marathi.freepressjournal.in