मजुरी देण्यास उशीर केल्याने मालकाची भोसकून हत्या

राकेशला जखमी अवस्थेत कासारवडवली येथील प्राइम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचा उपचारादराम्यान मृत्यू झाला आहे.
मजुरी देण्यास उशीर केल्याने मालकाची भोसकून हत्या

भिवंडी : २० दिवसांची मजुरी केल्यानंतर कामाचे पैसे देण्यास उशीर केल्याच्या रागातून कामगाराने मालकाला बेदम मारहाण करीत त्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्णा येथील एका कंपनीतून समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. अमित सोमई प्रजापती (२३) असे अटक झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर राकेश रामनरेश सिंग (४५) असे हत्या झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित हा कोपर येथे राहत असून तो राकेशच्या पूर्णा येथील अरिहंत कंपाऊंडमधील महाराष्ट्र पी.व्ही.सी. कंपनीत काम करत होता. मात्र काही कारणास्तव त्याने काम सोडले होते. दरम्यान, त्याने कंपनीत २० दिवस मजुरीचे काम केले होते. त्यामुळे त्याने १० एप्रिल रोजी कंपनीत जाऊन राकेशकडे मजुरीच्या पैशांची मागणी केली. त्यावेळी राकेशने पैसे देण्यासाठी त्याच्याकडे १० दिवसांची मुदत मागितली असता अमित आणि राकेशमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद उफाळून आल्याने अमितने राकेशला शिवीगाळीसह मारहाण करून चाकूने छातीत दोन ठिकाणी भोसकून गंभीर जखमी केले.

राकेशला जखमी अवस्थेत कासारवडवली येथील प्राइम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचा उपचारादराम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोऊनि आशिष पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in