भिवंडीतील रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगचे अतिक्रमण

शहरातील एसटी बस स्थानक ते कल्याण रोड या ठिकाणी शासकीय कार्यालये असल्याने या मार्गावर रस्त्यांच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात.
भिवंडीतील रस्त्यांवर अनधिकृत पार्किंगचे अतिक्रमण

भिवंडी : शहर महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीएमार्फत सिमेंटचे रस्ते बनविण्याचे काम सुरू असून, शहरातील वाहतुकीसाठी बनविलेल्या या नवीन रस्त्यांवर वाहनांचे अतिक्रमण होत असून, अशा मार्गावर वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूककोंडीचा करावा लागत आहे. अशाप्रकारे अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक विभागाने टोइंगद्वारे कारवाई करावी, तसेच महानगरपालिकेने वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील एसटी बस स्थानक ते कल्याण रोड या ठिकाणी शासकीय कार्यालये असल्याने या मार्गावर रस्त्यांच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी असते. तर शहरातील शिवाजीनगर, ठाणगे आळी आणि तीनबत्ती या परिसरातील रस्त्यांमधील अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते बनविले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीची सोय झाली. परंतु गेल्या महिन्यापासून या रुंद रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी अवैध पार्किंग सुरू केली आहे. तर त्यांच्याबरोबर हातगाडीवर भाजी विकणाऱ्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

शहरातील एसटी स्थानक ते कल्याण रोड या मार्गावर रस्त्यांवर उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी अशा सुमारे २०० वाहनांवर कारवाई केली असून, ही कारवाई कायम सुरू आहे. परंतु या मार्गावर सरकारी कार्यालये असल्याने शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या वाहनचालकांना त्यांची वाहने उभे करण्यासाठी पार्किंगची सोय केली पाहिजे. शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.

- मनीष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भिवंडी वाहतूक पोलीस विभाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in