

ठाणे : दिवाळीचा झगमगाट सुरू झाला आहे. रस्ते, सोसायट्या आणि उद्याने दिव्यांच्या प्रकाशाने उजळली आहेत. मात्र या कृत्रिम रोषणाईच्या आड झाडांचा श्वास घोटला जात असल्याची खंत ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठवून झाडांवरील विद्युत रोषणाईस तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये झाडांवर हॅलोजन्स, एलईडी आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी सजावट केली जाते. काही क्षण आकर्षक वाटणारी ही रोषणाई प्रत्यक्षात झाडांच्या जीवनप्रक्रियेला गंभीर धक्का देते. सूर्यास्तानंतर झाडांची विश्रांती सुरू होते, मात्र कृत्रिम प्रकाश त्यांच्या जैविक घड्याळात गोंधळ निर्माण करतो, वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम करतो. फक्त झाडेच नव्हे, तर पक्षी आणि निशाचर प्राणीही या कृत्रिम प्रकाशामुळे विस्कळीत होतात. दिशाभ्रम, घरटी कोसळणे, अंधाराशी सवयीने जगणाऱ्या प्राण्यांचे जीवन उद्ध्वस्त होणे अशा घटना वाढतात. झाडांवरील रोषणाई थांबवणे ही केवळ सौंदर्याची नव्हे, तर शास्त्रीय गरज आहे, असे डॉ. सिनकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साह पण तो निसर्गाचा बळी देऊन नसावा. झाडे, माती, पाणी आणि प्राणी-पक्ष्यांचा सन्मान केला, तरच आपण खऱ्या अर्थाने ‘निसर्गपूजा’ करू शकतो. म्हणूनच आगामी सणासुदीच्या काळात झाडांवरील कृत्रिम रोषणाईस सक्त बंदी घालण्याचे आदेश द्यावेत.
दिवाळी, नाताळ आणि नववर्ष अशा प्रत्येक सणात झाडांवरील विद्युत रोषणाई सुंदर दिसत असली तरी ती पर्यावरणासाठी विध्वंसक ठरते. मानवी आरोग्यावरदेखील तिचा परिणाम होत असून, निद्रानाश, ताण आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या वाढतात.
डॉ. सिनकर, पर्यावरण अभ्यासक
पालिकेचे पर्यावरणप्रेम हे केवळ दिखाऊ
दरम्यान, ठाणे महापालिकेने ‘पर्यावरणपूरक दिवाळी’चा नारा दिला असला तरी शहरातील झाडांवर दिव्यांचा झगमगाट कायम दिसून येत आहे. पालिकेचे पर्यावरणप्रेम हे केवळ दिखाऊ राहिले असून झाडांच्या संरक्षणाकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी टीका पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.