ठाण्यात ईव्हीएम व हजारो मतदार कार्डे सापडल्याने खळबळ

लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये शुक्रवारी ईव्हीएम आणि हजारो मतदार कार्डे सापडल्याने एकच खळबळ
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये शुक्रवारी ईव्हीएम आणि हजारो मतदार कार्डे सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. सध्या देशात ईव्हीएम की मतपत्रिका यावरून संघर्ष पाहायला मिळत असतानाच दादोजी कोंडदेव स्टेडियममधील भंगारात ईव्हीएम आणि हजारो मतदार कार्डे सापडली आहेत. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व वस्तू भंगारात विकल्या जाणार आहेत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीखाली (स्टँड) काही रिकाम्या खोल्या आहेत. ठाणे मनपाच्या या वास्तूमध्ये निवडणूक आयोगाकडून काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता. २०१४ पासून साठा करून ठेवलेल्या या वस्तूंकडे कोणाचेही लक्ष नव्हते.

गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडले जात नसल्याने अखेरीस ते दगडाने तोडण्यात आले. या खोलीत प्रवेश केल्यानंतर आत विजेची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. शिवाय, या खोलीत अनेक पेट्या आढळल्या. गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यात बंद लिफाफे, मतदार ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले. या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेकडून २०१४ मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यास दिली होती. मात्र, त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नव्हती. अनेक मतदारांच्या ओळखपत्रांचे वाटपही केले नसल्याचे त्यानिमित्ताने उघडकीस आले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी केला निषेध

दरम्यान, या प्रकारानंतर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करून या प्रकाराचा निषेध केला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांकडून खुलासा

दरम्यान, ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये अडगळीत सापडलेल्या ईव्हीएम व मतदार कार्डांचा सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in