तमनाथ आडिवलीजवळील उल्हास नदीत उत्खनन; शासनाचे नियम धाब्यावर

कोंदिवडे कर्जत रस्त्याच्या कडेने वाहणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी समजली जाते. या नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामे होणार नाहीत. याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.
तमनाथ आडिवलीजवळील उल्हास नदीत उत्खनन; शासनाचे नियम धाब्यावर

विजय मांडे/ कर्जत

खंडाळा घाटात उगम पावणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते. या नदीच्या आसपास कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाचे आहेत. मात्र तरी देखील नदीमध्ये मातीचे उत्खनन आणि नदीमध्ये असलेली बेट नष्ट करण्याचा धडाका आडिवली तमनाथ भागात सुरू आहे. राजकीय वरदहस्त असलेले तेथील बांधकाम दिवसेंदिवस अधिक वेगाने सुरू असून अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत.

कोंदिवडे कर्जत रस्त्याच्या कडेने वाहणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी समजली जाते. या नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामे होणार नाहीत. याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. असे असताना थेट पूर नियंत्रण रेषेमध्ये जाऊन बांधकाम आणि उत्खनन दररोज सुरू असून राजकीय वरदहस्ताने सुरू असलेले नदी पात्रातील बांधकाम कोण थांबविणार? असा प्रश्न सर्वसामान्य यांना पडला आहे. तमनाथ आणि आडिवली या भागात सुरू असलेले बांधकाम यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरणार आहे. मोहीली परिसरातील बहुसंख्य भागात पाणी शिरून नुकसान होणार असून पूर्वी १५० मीटर रुंदीचे नदीचे पात्र आज फक्त ५० मीटर रुंदीवर येवून ठेपले आहे. त्यामुळे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने नदीच्या पलीकडे असलेल्या भागातील रहिवासी यांची धावपळ आणि त्यांच्यासाठी रेस्क्यू करण्याची वेळ प्रशासनावर येणार हे जवळपास नक्की आहे.

आता तर नदीच्या पात्रात घुसून संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून मातीचे उत्खनन करून गाळ काढला जात आहे. त्या परिसरात गेली आठ दिवस पोक्लेन मशीनच्या सहाय्याने नदीमधून माती काढून बांधकाम केलेल्या ठिकाणी भराव टाकला जात आहे. त्यामुळे जुन्या नदी पात्राचे अवशेष मिटवून टाकण्याचा प्रयत्न संबंधित बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. गाळ भरलेली माती काढून नदीमध्ये अतिक्रमण करण्याचा डाव संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि जागा मालक यांचा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच नदीमध्ये वर्षानुवर्षे असलेले बेट देखील उद्ध्वस्त केली जात आहे. त्यासाठी अवजड मशीनच्या सहाय्याने ती बेटे नष्ट करून तेथे बोटिंग क्लब उभारण्यासाठी तयारी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली नदी मध्ये प्रदूषण करण्याचा प्रयत्न भविष्यात या ठिकाणी होणार आहे. स्वामित्व शुल्क आणि मार्च अखेर या काळात महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी कुठे खोदकाम सुरू आहे? याचा शोध घेत असतात. मुख्य रस्त्याच्या कडेला रात्रंदिवस पोक्लेन मशीनच्या सहाय्याने नदीमध्ये घुसून माती काढून अन्य ठिकाणी टाकली जात असताना महसूल विभाग तेथे कारवाई करून आपला महसूल वाढविण्यासाठी आग्रही नाही. याचे गणित देखील सर्वसामान्य लोकांच्या कळण्याच्या पलीकडील आहे.

स्थानिकांमध्ये नाराजी

राजकीय वरदहस्त यामुळे उल्हास नदीमध्ये सुरू असलेले बांधकाम आणि नदीपात्रात माती काढण्याचे सुरू असलेले उत्खनन याबाबत प्रशासनाची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे. नदीमधून पाणी उचलून शेती करण्याचा प्रयत्न केला तरी पाटबंधारे विभाग कारवाई करायला पुढे येत असल्याची असंख्य उदाहरणे स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहेत. मात्र राजकीय आशीर्वादाने सुरू असलेली बांधकाम आणि माती उत्खनन प्रशासनाला दिसत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in