कर्जतमध्ये विहिरींचे अस्तित्व धोक्यात; मोठमोठी गृहसंकुले उभारण्यासाठी विहिरी नामशेष

पाच-सहा गुंठ्याचा प्लॉट, त्यामध्ये नारळ, केळी, शेवगा ही झाडे, थोडीफार फुलझाडे, कौलारू घर आणि घराच्या मागे अथवा पुढच्या बाजूस एक विहीर असे छानसे चित्र पूर्वी कर्जत शहर आणि परिसरात दिसे.
कर्जतमध्ये विहिरींचे अस्तित्व धोक्यात; मोठमोठी गृहसंकुले उभारण्यासाठी विहिरी नामशेष

कर्जत : पाच-सहा गुंठ्याचा प्लॉट, त्यामध्ये नारळ, केळी, शेवगा ही झाडे, थोडीफार फुलझाडे, कौलारू घर आणि घराच्या मागे अथवा पुढच्या बाजूस एक विहीर असे छानसे चित्र पूर्वी कर्जत शहर आणि परिसरात दिसे. कोतवालनगरमध्ये, तर बहुतांशी घरासमोर एक विहीर हमखास पाहायला मिळत असे. त्यामुळे कर्जत विहिरींचे नगर असे म्हटल्यास वावगे ठरू नये; मात्र बदलत्या काळात कर्जत शहरातील हे चित्र झपाट्याने बदलले असून, वाढत्या गृहसंकुलाच्या उभारणीत या विहिरी नामशेष झाल्या आहेत.

जीवनात पाण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यान भरलेल्या या विहिरी त्या घरांच्या वैभवात भर घालत असे. विहिरीवर रहाट बसवून गरज भासेल तसे पोहऱ्याने पाणी सहज बाहेर काढता येत असे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित असला तरी लोकांची गैरसोय होत नसे. याच विहिरीच्या सांडपाण्यावर केळी, पेरू, अबोली, मोगरा आदी फळ-फुलांची परसबाग फुललेल्या दृष्टीस पडायच्या. या बहरलेल्या फळं-फुलांमुळे वातावरणही प्रसन्न आणि आल्हाददायक राहायचे. याच विहिरीवर घरातील पुरुष मंडळी बादली बादलीने पाणी अंगावर घेऊन आंघोळीची मजा घ्यायचे, तर उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या पाहुणे मंडळींची मुले, नातवंड याच विहिरीत पोहायला शिकायची. तेव्हा पोहणे शिकण्यासाठी स्विमिंगपूलमध्ये जाणे ही संकल्पनाही कोणाच्या ध्यानीमनी नव्हती.

विहिरीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या थंडगार पाण्याच्या साठ्यामुळे साहजिकच आजूबाजूला गारवा जाणवत असे. विहिरीला अनेक झरे असल्याने पाणीही भरपूर असायचे. अगदी मे महिन्यातही पाण्याची चिंता नसायची; मात्र मागील काही वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलत गेले. मुंबई पुण्याच्या मध्यावर असल्याने तसेच मध्य रेल्वे मार्गावरील वाढती लोकल सेवा अन्य रस्ते अशा वाढत्या दळणवळण सोयीसुविधेमुळे कर्जतला घर घेण्यासाठी अधिक पसंती मिळू लागली. त्यातच कर्जत- पनवेल लोकल सुरू होणार असल्याने ही पसंती वाढू लागली. अगदी ठाणे-कल्याण येथील घरांच्या किमतीच्या निम्म्या किमतीत घरे उपलब्ध होत असल्याने घरांची मागणी वाढली. तसेच कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेकांनी मुलांच्या शिक्षणाच्या हेतूने कर्जत शहरात वास्तव्य करणे पसंत केले. साहजिकच या घराच्या वाढत्या मागणीचा लाभ विकासकांनी (बिल्डर) घेण्याचे ठरवले.

विकासकांनी मोठमोठी गृहसंकुले उभारण्यासाठी या जुन्या घरमालकांना लाखो करोडोंचा मोबदला देत त्यांच्या जागा जुन्या घरासहित खरेदी केल्या. परिणामी कधी एके काळी बैठ्या चाळसदृश बैठी घरे पाडली जाऊन त्या जागेवर तीन-चार मजली इमले उभे करण्याचे काम विकासकांनी हाती घेतले. आता नवीन नियमांमुळे बारा मजली इमारती उभ्या राहात आहेत; मात्र हे काम करताना या जागेमधील झाडे, विहिरी अडचणीच्या ठरू लागल्या.

logo
marathi.freepressjournal.in