मुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणीसाठी धमकी; ज्योतिषाने केली पोलीस उपायुक्तांकडे तक्रार

मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला संकेत पुजारा नामक एका इसमाने चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणीसाठी धमकी; ज्योतिषाने केली पोलीस उपायुक्तांकडे तक्रार

ठाणे : मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला संकेत पुजारा नामक एका इसमाने चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ज्योतिषाने याप्रकरणी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. याबाबत सदर ज्योतिषानेच ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे रेल्वे स्टेशनसमोरच्या ठाकोर इमारतीमध्ये परशुराम भट्टर हे ज्योतिष, कुंडली पाहण्याचे काम करतात. त्यांच्या परिचयाचे सुरेश व्यंकटेश रेड्डी हे देखील भट्टर यांच्याकडे येत होते. भट्टर यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे रेड्डी यांची भरभराट होत असल्याने भट्टर यांना चारचाकी वाहन घेण्यासाठी काही रक्कम भेट म्हणून दिली होती. ही रक्कम कधीच परत करू नका, असेही रेड्डी यांनी सांगितले होते. भट्टर यांनी देखील रेड्डी यांना ३० लाखांचे तीन धनादेश रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणेच सुरेश व्ही. या नावाने दिले. पहिले दोन चेक वठल्यानंतर आपल्या खात्यात पैसे आले नाहीत, असा कांगावा करीत रेड्डी यांनी तिसरा चेक थांबवण्यास सांगून पनवेल येथील मा. नगरसेवक संतोष शेट्टी यांना उर्वरित दहा लाख देण्यास सांगितले.

त्यानुसार भट्टर यांनी पाच लाखांचे दोन धनादेश दिले. त्यानंतर ५ जून रोजी संकेत पुजारा याने भट्टर यांच्या कार्यालयात येऊन, तू मुख्यमंत्र्यांच्या नावावर खूप कमाई केली आहेस. मी एकनाथ शिंदे यांचा खास माणूस असून माझ्यासोबत त्यांचा ड्रायव्हर आला आहे. तू रेड्डी यांची फसवणूक केली असून प्रकरण संपवण्यासाठी मला दहा लाख दे, नाहीतर तुझी वाट लावेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी भट्टर यांनी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला आणि त्यांना तक्रार अर्ज दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री हे चांगले काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. ते अशा पद्धतीने धमकी देणारे लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत. या गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी भट्टर यांनी पत्रकार परिषदेत केली.

logo
marathi.freepressjournal.in