
यंदा २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या जादा गाड्यांसाठी प्रवाशांनी आजच आपले आरक्षण निश्चित करण्याचे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दर मंगळवारी प्रचंड गर्दी असते. मात्र या मंगळवारांव्यतिरिक्त मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवाला देखील या ठिकाणी यात्रा भरत असल्याने प्रचंड गर्दी असते. त्यातच यंदा २५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा होत असल्याने दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील सुट्टी असल्याने सलग दोन लागून आलेल्या या सुट्टीमुळे यावेळी दरवर्षी पेक्षा भक्तांची जास्त गर्दी अपेक्षित असल्याने या गर्दीत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचा विचार करून दहा जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एवढेच नव्हे तर या दहा गाड्यांव्यातिरिक्त पेण आगारातील चार बसेस, रोहा आगारातील दोन बसेस, अलिबाग आगारातील दोन बसेस आणि कर्जत आगारातील दोन बसेस अशा एकुण आणखी दहा बसेस पाली बस स्थानकातून लोकल प्रवासासाठी सज्ज ठेवण्याचा निर्णय देखील एसटी महामंडळाने घेतला आहे. परंतु आरक्षणासाठी ज्या जादा दहा गाड्या राखून ठेवल्या आहेत या जादा गाड्यांचा आमच्या प्रवाशांनी पुरेपूर वापर करून घ्यावा आणि आपले आरक्षण लवकरात लवकर निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि Msrtc.gov.com या ठिकाणी जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे असे सूचित करण्यात आले आहे.
महामंडळाच्या जादा गाड्या
२४ जानेवारी
ठाणे ते पाली (१७: ०० वाजता)
मुंबई ते पाली (१७:०० वाजता)
बोरिवली ते पाली (१७: ०० वाजता)
२५ जानेवारी
ठाणे ते पाली (५:३० वाजता)
मुंबई ते पाली (६:०० वाजता)
बोरिवली ते पाली (६:०० वाजता)
२६ जानेवारी
पाली ते ठाणे (१५: ०० वाजता)
पाली ते ठाणे (१६: ०० वाजता)
पाली ते मुंबई (१७:०० वाजता)
पाली ते बोरिवली (१८:०० वाजता)