जोंधळेंची संपत्ती हडपण्यासाठी खोट्या मृत्युपत्राचा आधार! पत्नी, मुले, वकील, डॉक्टरसह ६ जणांवर गुन्हा दाखल

शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांवर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झाले आहे.
जोंधळेंची संपत्ती हडपण्यासाठी खोट्या मृत्युपत्राचा आधार! पत्नी, मुले, वकील, डॉक्टरसह ६ जणांवर गुन्हा दाखल
Published on

शहापूर : शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांवर ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झाले आहे. मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात शिवाजीराव जोंधळे यांची पत्नी, दोन मुले, खोटे मृत्युपत्र बनवणारे वकील, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर, साक्षीदार यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख तथा वर्षा शिवाजीराव जोंधळे यांनी गुरुवारी संध्याकाळी आसनगाव येथे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही धक्कादायक बाब उघड केली. वर्षा ही शिवाजीराव जोंधळे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी असल्याचे सांगत त्या कायदेशीर वारस असल्याचा घटनाक्रम सांगितला. यामध्ये त्यांनी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू दिनांक १९ एप्रिलला झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी, त्यांची दोन मुले यांनी त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करित दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस अनेक शेतजमिनींचे शिवाजीराव यांच्या नावे असलेल्या शेतजमिनी नावावर करण्यासाठी एका मृत्युपत्राच्या आधारे वारस लावण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळेस वर्षा यांनी असे कुठलेही मृत्युपत्र वडिलांनी तयार करून ठेवल्याचे त्यांना सांगितलेले नसल्याने त्यांना हे मृत्युपत्रबोगस असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याबाबत खात्री करण्यास सुरुवात केली.

दिनांक १३ मार्चला हे नोंदणीकृत मृत्युपत्र नोटरी केल्याचे लक्षात आले, मात्र त्यावर असलेली सही ही खोटी असल्याचे देखील वर्षा यांच्या लक्षात आले. तसेच वडिलांचा १३ मार्चचा मोबाईल लोकेशनचा डेटा मागवले असता शिवाजीराव जोंधळे हे १३ मार्च रोजी मुंबई फोर्ट परिसरात गेले असल्याचे निदर्शनास आले नाही.

आझाद मैदान पोलिसांनी पत्नी वैशाली जोंधळे, मुले सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, ॲड. निलेश मांडवकर, नोटरी वकील टी. सी. कौशिक, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते, मृत्युपत्राचे साक्षीदार किशोर जोंधळे, चैतन्य बडवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आझाद मैदान पोलीस ॲक्शन मोडवर

वर्षा देशमुख यांनी ३१ ऑक्टोबरला मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात वडिलांचे खोटे मृत्युपत्र बनवून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबतची तक्रार पोलिसांना दिली. आझाद मैदान पोलिसांनी सदरचा मृत्युपत्र, नोटरी वकील, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर, वर्षा जोंधळे यांची सावत्र आई, २ सावत्र भाऊ, २ साक्षीदार यांची चौकशी केली असता पोलिसांना देखील हे मृत्युपत्र खोटे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in