

शंकर जाधव/डोंबिवली
उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘Telma AM’ या औषधाच्या नावाखाली बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारे रॅकेट मानपाडा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी डोंबिवली आणि मुंबईतील दोन वितरकांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे. रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकारामुळे औषध बाजारात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज उपाध्याय आणि विवेक राय अशी अटक करण्यात आलेल्या वितरकांची नावे आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात बनावट औषधांचा मोठा साठा आढळून आला आहे. उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘Telma AM’ या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या नावाखाली बनावट गोळ्यांची विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गोळ्यांवर ग्लेनमार्क फार्मा कंपनीचे लेबल वापरण्यात आले होते.
कंपनीच्या प्रतिनिधींना ठाणे परिसरात त्यांच्या ब्रँड नावाने संशयास्पद औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएच्या जप्त नमुन्यांमध्ये गंभीर तफावत आढळली. प्रयोगशाळा विश्लेषणात या गोळ्या अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा विरघळत असल्याचे समोर आले. त्यामुळे औषधाचा परिणाम विलंबाने होऊन रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. एफडीए निरीक्षक राजश्री शिंदे यांच्या कारवाईत डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’ या वितरकाकडून सुमारे १,००० पट्ट्या जप्त करण्यात आल्या. एफडीएने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात यांनी वितरक पंकज उपाध्याय यांना अटक केली. चौकशीत त्यांनी बिहारमधील कंपनीकडून ६,००० पट्ट्या खरेदी केल्याचे सांगितले; मात्र संबंधित कंपनीच्या नावाने बनावट बिल तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तपासात मुंबईतील वितरक विवेक रायलाही अटक करण्यात आली आहे.
बनावट औषधांची निर्मिती करणाऱ्या मूळ उत्पादन युनिटचा शोध सुरू असून हे रॅकेट अनेक राज्यांमध्ये पसरले असण्याची शक्यता आहे. संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी तपासाचा वेग वाढविण्यात आला आहे.
अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त झोन-३