पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी झाले हवालदिल

पाऊस पडावा म्हणून चातकाप्रमाणे नजरा आभाळाकडे लावून वाट पाहत आहे.
 पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी झाले हवालदिल
Published on

जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील जीवन हे पुर्णतः शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगाम हा शेतीच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे. परंतू शेतकरी पिकासाठी पावसाच्या पाण्याची वाट पाहण्यात चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस पडावा म्हणून चातकाप्रमाणे नजरा आभाळाकडे लावून वाट पाहत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जव्हार तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही वेळ कडक ऊन तर काही वेळ ढगाळ वातावरण अशा प्रकारे सायंकाळपर्यंत ऊन सावलीचा खेळ सुरू असतो. तापमानात किंचित घसरण झाली असली तरीही उष्ण व दमट वातावरणामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मे महिन्यात तापमानाने ४४ अंश सेल्सिअस पार केल्याची नोंद आहे.

ढगाळ वातावरण निर्माण होऊन वारा सुटतो. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे निमार्ण झालेल्या दमट वातावरणामुळे अंगाची रखरख होत असून घामाच्या धारा वाहत आहेत.

अभ्यासाअंती भारतीय हवामान खात्याने या वर्षी लवकरच व भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र पावसाचे काहीच संकेत दिसून येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतजमिनीत ओलावा नसल्याने दमदार पावसाअभावी मशागतीची कामे खोळंबली आहेत. येरे.. येरे पावसा, तुला देतो पैसा!" या बालगीताची आठवण आता जव्हार तालुक्यात पुन्हा ताजी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in