कोंढाणे धरणासाठी शेतकऱ्यांचे २४ जानेवारी रोजी उपोषण

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत २०११मध्ये कोंढाणे धरण मंजूर करण्यात आले.
कोंढाणे धरणासाठी शेतकऱ्यांचे २४ जानेवारी रोजी उपोषण
Published on

कर्जत : कर्जत तालुक्यात उल्हास नदीवर कोंढाणे येथे मध्यम धरण प्रकल्प उभारला जाणार आहे. २०११ मध्ये धरण झाल्यावर प्रकल्पाने बाधित होणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण न करता खोदकाम करण्यात आले होते. तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खोल खड्डे खोदून तब्बल बारा वर्षे लोटली, तरी आदिवासी लोकांच्या जमिनी देण्यात आलेल्या नाहीत. तसेच वापरलेल्या जमिनीचे भू भाडे आणि धरणाच्या कामासाठी जमीन वापरण्यात आली. त्याचा मोबदला मिळविण्यासाठी कोंढणे धरण परिसरातील मुंढेवाडी येथील शेतकरी २४ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत २०११मध्ये कोंढाणे धरण मंजूर करण्यात आले. कोंढाणे धरण परिसरात असलेल्या आदिवासी शेतकरी यांचे शेतजमिनीचे कोणतेही भूसंपादन केले नाही, असे असताना आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतून लागवड असलेली शेती उद्ध्वस्त करून त्यातून माती काढून घेण्यात आली. त्यामुळे २०१२पासून तेथील आदिवासी लोक हे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तसेच घराच्या मागे पुढे २० - २५ फुटाचे खड्डे तयार करून ठेवले असल्याने पावसाळ्यातआदिवासी लोकांची असंख्य गुरे त्या खड्ड्यात पडून वाहून गेली आहेत.

'या' आहेत मागण्या

शेतजमिनीची नुकसानभरपाई या आदिवासी शेतकऱ्यांना अजतागायत देण्यात आलेली नाही. शासनाकडून कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण काही कारणास्तव सिडकोकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिडकोकडून कोंढाणे धरण क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व्हे सुरू असून, संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली. सिडकोकडून आदिवासी शेतकऱ्यांचे पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच आदिवासी शेतकरी यांच्या शेतजमिनी भूसंपादन मोबदला आदिवासी शेतकरी यांना तत्काळ देण्यात यावा आणि सिडकोकडून आजपर्यंत शेतजमिनी नादुरुस्त करण्यात आलेल्या जमिनीची नुकसानभरपाई आणि भू-भाडे देण्यात यावे, या मागणीसाठी हे आदिवासी शेतकरी उपोषणाला बसणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in