शेतकऱ्यांचे कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे;श्री मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात.
शेतकऱ्यांचे कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे;श्री मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे : शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. त्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटने-नार्हेण फाटा, तळोजा एमआयडीसी रोड येथे आयोजित श्री मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ महाराज म्हाळूंगे, चेतन महाराज म्हात्रे, दिगंबर शिवनारायणजी, विष्णूदादा मंगरुरकर, गणपत सांगू देशेकर, गोपाल चेतनजी, शंकरजी गायकर, दिनेश देशमुख, गणेश पीर, आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अनेक साधू संत, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येथील वारकरी भाविकांची उपस्थिती पाहून खरोखरीच पंढरी अवतरल्याचे वातावरण तयार झाले आहे. या पुण्यभूमीत कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाला रायगड व ठाणे जिल्ह्यातील वारकारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे पाहून अतिशय आनंद झाला आहे. या वातावरणात हातात टाळ घेवून रिंगणामध्ये आणि दिंडीमध्ये सहभागी होताना देहभान विसरायला झाले. देवाच्या या दारी उभा क्षणभरी..! या उक्तीची अनुभूती येवून देवाच्याच दारी आपण सगळे उभे राहिलो आहोत, असाच भास होत आहे. अखंड हरिनामाने भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावणारी ही आध्यात्मिक ताकद आहे. आमच्या सारख्या राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संत महात्मांच्या प्रेरणेने देश आणि समाज कार्यासाठी काम करण्याची उमेद निर्माण होते. मला काय मिळाले, यापेक्षा मी देश आणि समाजासाठी काय देतो, ही भावना जागृत होते. म्हणूनच राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यामिक अधिष्ठान सर्वश्रेष्ठ आहे.

अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज

आपल्या महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. संतांचा सन्मान करणे, ही आपली संस्कृती आहे. श्रीक्षेत्र मलंगड आणि या भूमीतील पुरातन शिवमंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आजच्या या हरिनामाच्या परिस स्पर्शाने हा परिसर सुवर्णमय झाला आहे. ‘संत येती घरातच दिवाळी दसरा..!’ असेच आजचे वातावरण आहे. मराठी संस्कृतीचे वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवितो. कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतो. कीर्तनकाराचे महत्त्व आपल्या महाराष्ट्रात खूप आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रत्येक हरिनामाला उपस्थित रहायचे. धकाधकीच्या आयुष्यातूनही ते हरिनामासाठी वेळ काढायचे आणि आम्हालाही सांगायचे. सन्मार्गावर कायम चालत राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज आहे.

तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

हे सरकार आल्यावर आपले सर्व सण-उत्सव मनमोकळेपणाने उत्साहाने साजरे होऊ लागले आहेत. राज्यातल्या सर्व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरास १३८ कोटी रुपयांचा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मिळवून दिला आहे. अशाच प्रकारे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील सरकारकडून कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारीला जाणाऱ्या भाविकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत, यापुढे अधिकाधिक सोयीसुविधा दिल्या जातील. शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय या शासनाकडून घेण्यात आला आणि यापुढेही असे अनेक उपक्रम या शासनाकडून राबविण्यात येतील.

logo
marathi.freepressjournal.in