फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार; संस्थाचालकांवर कारवाई - मुख्यमंत्र्यांचा इशारा, एसआयटीची स्थापना - देवेंद्र फडणवीस

आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार; संस्थाचालकांवर कारवाई - मुख्यमंत्र्यांचा इशारा, एसआयटीची स्थापना - देवेंद्र फडणवीस
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, या घटनेची तातडीने चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

क्वीक रिस्पॉन्स टीम उभी करा!

विद्यार्थिनींना संशय आल्यास त्यांनी तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता सदर बाब निदर्शनास आणून देता आली पाहिजे अशी यंत्रणा हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नराधमाला फाशीच होणार- चित्रा वाघ

बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वत: एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते, असे भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in