भिवंडी : बाप नंबरी बेटा दस नंबरी या हिंदी चित्रपटाला शोभणारी हुबेहुब कथा भिवंडी शहरात घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याने त्याच परिसरात राहणाऱ्या त्याच्या अन्य दोघा साथीदार व्यापारी पिता-पुत्रावर विश्वासाने ५५ लाखांचा माल भाडेतत्त्वावर दिला असता त्या दोघांनी मालाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंतीलाल देढीया व जयेश जयंतीलाल देढीया अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्राची नावे असून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जिगर बिपीन शहा (४०) यांचे वुड्स बॉगचा मोठा व्यवसाय आहे. तर आरोपी पिता-पुत्र हे मुलुंड पश्चिम भागात एका हायप्रोफाईल सोसायटीत राहतात. या आरोपी पिता-पुत्राची ओळख तक्रारदार व्यापारी जिगर यांच्याशी मार्च २०२३ मध्ये झाली. या ओळखीतून या दोघा आरोपी पिता-पुत्रांनी जिगर शहा यांच्याशी बाप नंबरी बेटा दस नंबरी या हिंदी चित्रपटासारखी चलाखी दाखवत व्यापारामध्ये भागीदारी करून विश्वास संपादन केला. दरम्यान, व्यापारी जिगर बिपीन शहाने त्याचे साथीदार व्यापारी आरोपी पिता-पुत्राकडे भिवंडीतील राहनाळ येथील जयेश स्टोरेज या ठिकाणी विश्वासाने ५५ लाख ३७ हजार ९०८ रुपये किमतीचा सिथेटिक रबर वूड्स व नॅचरल रबर वूड्सच्या बॅगांचा माल विश्वासाने सोपवला होता. मात्र त्यांनी या मालाची आजतागायत परतफेड केलेली नाही.