कल्याणच्या सुभेदारीसाठी दिल्लीची फिल्डिंग

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असलेला कल्याण मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत भाजप असल्याचे दिसते.
कल्याणच्या सुभेदारीसाठी दिल्लीची फिल्डिंग

राज्यात सत्ताबदल झाला असून भाजपच्या मदतीने शिवसेनेतील फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात सत्ताबदल होताच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असलेला कल्याण मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याच्या तयारीत भाजप असल्याचे दिसते.

आजपासून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर सलग तीन दिवस कल्याण लोकसभा मतदारसंघात तळ ठोकणार असून त्यांच्या एकाही कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांचा समावेश नाही. तसेच केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनाही जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दोन दशकापूर्वी ठाणे जिल्हा हा भाजपचा गड समजला जायचा परंतू शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण केले,आणि भाजपकडून लोकसभेची ठाण्याची जागा शिवसेनेकडे खेचून घेतली.

मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर कल्याण लोकसभा हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत स्व:तकडे खेचला आणि भाजपला भिवंडीला पाठवले. अशाप्रकारे शिवसेनेमागे भाजपची फरफट सुरू होती. मात्र आठ वर्षांपूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच बहुमतातील भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि राज्यातील भाजपला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाजपची कुरघोडी सुरू होती.

सध्या राज्यात मुखमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सरकारमध्ये भाजपचा वरचष्मा आहे त्यामुळे आपले गेलेले वैभव परत मिळवण्याची स्वप्ने भाजप नेतृत्वाला पडू लागली आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास भाजप नेतृत्वाने सुरुवात केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून आलेल्या कपिल पाटील यांना भाजपने भिवंडीतून उमेदवारी दिली आणि ते जिंकले. त्यानंतर त्यांनाच विभागीय अध्यक्षपद बहाल करत ग्रामीण भागात शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला गेला.

२०१९च्या लोकसभेतही तेच जिंकले सध्या ते केंद्रात पंचायत राज राज्यमंत्री आहेत. त्यामुळे या परिसरात भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे.

तर पाटील यांनी भिवंडी , कल्याण ग्रामीण आणि शहापूर परिसरातही भाजपला बळ देण्याचे यशस्वी प्रयत्न चालू केले आहेत. असे असताना एकनाथ शिंदे जे भाजपसोबत सत्तेत आहेत त्यांच्याच कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्याची जबाबदारी अनुराग ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

भाजपची नेमकी भूमिका गुलदस्त्यात?

कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे करत आहेत. त्यांनी मूळ शिवसेनेपासून फारकत घेतली असल्याने ते आगामी निवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार याची चर्चा सुरू असताना राज्यातील सर्वच मतदारसंघात कमळ फुलणार असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात येवून केला होता. दरम्यान आमदार संजय केळकर हे या मतदारसंघात यापुढे भाजपचा खासदार असेल हे सांगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटाच्या खासदाराच्या मदारसंघात त्यांचेच उमेदवार असतील असे सांगत आहेत. तर आता अनुराग ठाकूर तीन दिवसासाठी कल्याणमध्ये तीन दिवस तळ ठोकून राहणार असल्याने भाजपची नेमकी भूमिका काय हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in