ठाणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाल्यानंतर ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. भाजप महिला मोर्च्याच्या वतीने माजी नगरसेविका मृणाल पेंडसे आणि महिला कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने ठाण्यात पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पेढे वाटून लाडक्या बहिणींना शुभेच्छा देण्यात आल्या. दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने आनंद आश्रमात लाभार्थींना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.
राज्य सरकारने लागू केलेल्या योजनेवरून एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात भाजपच्या रवी राणा यांनी वादग्रस्त लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त विधान करून भाजपला चांगलेच अडचणीत आणले आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी १५०० रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्र विकत घेणार का? अशी टीका देखील सत्ताधाऱ्यांवर केली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात योजनेचा हप्ता जमा झाल्याने दोन्ही पक्षाच्या वतीने ठाण्यात जल्लोष करण्यात आला.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनेही माजी खासदार आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे देखील भरवण्यात आले.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आनंद आश्रम या ठिकाणी देखील लाभार्थीना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. या योजनेला महाराष्ट्रातील बहिणींचा चांगला प्रतिसाद मिळत असून नियमितपणे बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असा विश्वास माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
३५ लाख बहिणींच्या खात्यात ९०० कोटींचे वितरण
भाजपच्या महिला मोर्च्याच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मृणाल पेंडसे यांनी सरकारच्या योजनेचे कौतुक केले. आम्हाला अतिशय आनंद होत आहे की, महाराष्ट्रातील ३५ लाख बहिणींच्या खात्यात ९०० कोटींचे वितरण करण्यात आले आहे. विरोधकांनी चुनावी जुमला म्हणून खटाखट सारखे पैसे वाटू असे आश्वासन दिले होते. मात्र महायुती सरकारने ही योजना आणून पटापट बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसारखे भाऊ महाराष्ट्रातील बहिणांना मिळाले याचा आम्हाला अभिमान असल्याचे महाराष्ट्र महिला सचिव नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील मारामाऱ्यांमुळे बहिणी त्रस्त - जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. मंत्रिमंडळात होणाऱ्या मारामाऱ्या, एकमेकांवर खेकसणे हे बघून उभा महाराष्ट्र त्रस्त आहे. त्याचबरोबर सर्व बहिणी सुद्धा त्रस्त असल्याची प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील बहिणी रडत आहेत की भावाभावांमध्ये हे काय चालू आहे? असा टोला देखील आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.